'MH-60R' सीहॉक हेलिकॉप्टर नौदलात सामील.
भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी अधिक मजबूत : आणखी दोन हेलिकॉप्टर पुढील आठवड्यात मिळणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय नौदलाला आणखी एक आधुनिक ‘एमएच-60आर’ सीहॉक हेलिकॉप्टर मिळाले आहे. या आठवड्यात आणखी दोन हेलिकॉप्टर भारतात दाखल होत असून त्यामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिनने विकसित केलेले हे हेलिकॉप्टर गेल्या आठवड्यात कोची येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. अमेरिकी दूतावासाच्या माहितीनुसार, या आठवड्यात आणखी दोन ‘एमएच-60आर’ हेलिकॉप्टर भारतात दाखल होणार आहेत. या माध्यमातून भारताला 24 हेलिकॉप्टरच्या वितरणाची प्रक्रिया वेगाने पुढे जाताना दिसत आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होत आहे. याचसंदर्भात भारतीय नौदलाला आणखी एक अत्याधुनिक ‘एमएच-60आर’ सीहॉक नौदल हेलिकॉप्टर मिळाले आहे. भारतातील अमेरिकी दूतावासाने याला दोन्ही देशांमधील संरक्षण भागीदारीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हटले आहे. भारतातील अमेरिकी राजदूत सर्जिओ गोर यांनी याला द्विपक्षीय संरक्षण सहकार्यासाठी एक चांगली बातमी म्हटले आहे.
अमेरिकी दूतावासाने दिली माहिती
भारतातील अमेरिकी दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती जारी करताना लॉकहीड मार्टिनने बनवलेले आणखी एक ‘एमएच-60आर’ सीहॉक नौदल हेलिकॉप्टर भारतीय किनारपट्टीवर दाखल झाल्याची घोषणा केली आहे. भारताने आपली नौदल क्षमता मजबूत करण्यासाठी अमेरिकेकडून 24 ‘एमएच-60आर’ सीहॉक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला आहे. ही हेलिकॉप्टर टप्प्याटप्प्याने वितरित केली जात आहेत. भारतीय नौदल प्रामुख्याने ही हेलिकॉप्टर युद्धनौकांवर तैनात करत असल्यामुळे हिंद महासागर क्षेत्रात आपली सागरी सुरक्षा क्षमता, पाणबुडी निगराणी आणि सागरी सीमा संरक्षण क्षमता मजबूत होईल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील बदलत्या सामरिक परिस्थितीत एमएच-60आर हेलिकॉप्टरच्या तैनातीमुळे भारतीय नौदलाच्या कार्यवाही क्षमतेला नवी चालना मिळेल. शिवाय, ही डिलिव्हरी भारत आणि अमेरिका यांच्यातील सतत दृढ होत असलेल्या सामरिक आणि संरक्षण संबंधांचे एक महत्त्वाचे संकेत मानली जाते.
सीहॉक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज
एमएच-60आर सीहॉक हे जगातील सर्वात प्रगत बहुउद्देशीय नौदल हेलिकॉप्टरपैकी एक आहे. हे पाणबुडीविरोधी युद्ध, पृष्ठभागावरील युद्ध, सागरी निगराणी, शोध आणि बचावकार्य आणि विशेष नौदल मोहिमांसाठी विकसित केले गेले आहे. अत्याधुनिक रडार, सोनार, इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि आधुनिक शस्त्रप्रणालींनी सुसज्ज असलेले हे हेलिकॉप्टर भारतीय नौदलाच्या सागरी निगराणी आणि लढाऊ क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करेल.
Comments are closed.