खेळा, नाहीतर माघार घ्या! पंजाबचे मैदान बदलणार नाही; हॉकी इंडियाने पाकिस्तानची मागणी धुडकावली
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेपूर्वीच हिंदुस्थान-पाकिस्तान हॉकी सामना मैदानाबाहेर चर्चेत आला आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत पाकिस्तानने स्पर्धा हिंदुस्थानबाहेर हलवावी किंवा आपल्या सामन्यांसाठी तटस्थ मैदान द्यावे, अशी मागणी आशियाई हॉकी महासंघाकडे केली आहे. मात्र हॉकी इंडियाने ही मागणी धुडकावून लावत स्पर्धेचे नियोजित ठिकाण बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मोहाली आणि जालंधर येथे 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. जालंधरमध्ये साखळी फेरी, तर मोहालीमध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत हिंदुस्थान, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन आणि जपान सहभागी होणार आहेत; बांगलादेश आणि ओमान राखीव संघ आहेत.
पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष मोहियुद्दीन अहमद वानी यांनी सध्याच्या संवेदनशील द्विपक्षीय परिस्थितीचा आणि सुरक्षेच्या कारणांचा हवाला देत तटस्थ मैदानाची मागणी केली. पाकिस्तानला आपल्या खेळाडू आणि अधिकाऱयांसाठी सुरक्षित वातावरण हवे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याच वेळी पाकिस्तान स्पर्धेत सहभागी होण्यास आणि हिंदुस्थानसह अन्य संघांविरुद्ध खेळण्यास तयार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
मात्र हॉकी इंडियाचे महासचिव आणि आशियाई हॉकी महासंघाचे उपाध्यक्ष भोला नाथ सिंह यांनी स्थळ बदलण्याची शक्यता स्पष्टपणे फेटाळली. पाकिस्तानला स्पर्धेत खेळायचे असेल तर हिंदुस्थानात यावे लागेल, अशी त्यांची भूमिका आहे. स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार पंजाबमध्येच होणार असल्याचे त्यांनी सांगितले
पाकिस्तानने हिंदुस्थानात येण्यास नकार दिल्यास त्याच्या जागी बांगलादेश किंवा ओमानला संधी देण्याचा पर्याय असल्याचेही भोला नाथ सिंह यांनी सांगितले आहे. दरम्यान, हिंदुस्थान-पाकिस्तान सामना 1 नोव्हेंबरला जालंधरमध्ये होणार असल्याचे सध्याच्या वेळापत्रकात आहे. पंजाबमध्ये तब्बल 18 वर्षांनंतर मोठय़ा आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे पुनरागमन होत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments are closed.