वाहनांच्या ताफ्याचा आकार कमी करण्याचे पंतप्रधानांचे आदेश
देशवासीयांना आवाहनानंतर उचलले पाऊल : ताफ्यात ई-वाहने सामील होणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:च्या वाहन ताफ्याचा आकार अत्यंत कमी केला आहे. हे पाऊल त्यांच्या अलिकडेच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर उचलण्यात आले आहे. यामुळे ताफ्यातील वाहनांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. परंतु एसपीजी प्रोटोकॉलनुसार आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. हैदराबाद येथील मोदींच्या भाषणानंतर त्वरित गुजरात आणि आसाममध्ये देखील ताफ्याचा आकार कमी करण्यात आला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जेथे शक्य असेल तेथे ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांना सामील केले जावे, परंतु याकरता नव्या वाहनांची खरेदी केली जाऊ नये अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली असल्याचे समजते. खर्चात कपातीचे हे अभियान आता भाजप शासित राज्यांमध्येही दिसून येत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव समवेत अन्य नेत्यांनीही स्वत:च्या ताफ्यातील वाहनांची संख्या घटविण्याचा निर्णय घेतला आहे.
योगींनीही दिले निर्देश
वाढता इंधन खर्च आणि जागतिक स्थिती पाहता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. स्वत:च्या मंत्र्यांच्या ताफ्यात त्वरित 50 टक्क्यांची घट करण्याचे निर्देश योगींनी दिले आहेत. ताफ्यातील अनावश्यक वाहनांना कमी केले जावे असे स्पष्ट करत योगींनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाशी जोडले जात राज्यातील लोकांना इंधनाचा वापर कमी करणे, सोन्याची अनावश्यक खरेदी टाळणे आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. शासकीय स्तरावर साधेपणा आणि बचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला जावा असेही योगींनी नमूद केले आहे.
मध्यप्रदेशातही उचलले पाऊल
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्याचा आकार देखील 13 वरून कमी करत 8 वाहनांचा करण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत सर्व शासकीय आणि अधिकृत दौऱ्यांमध्ये मर्यादित वाहनांचाच वापर केला जाईल. ताफ्यात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कमीतकमी वाहने असतील आणि दौऱ्यादरम्यान कुठलीच वाहन रॅली होणार नसल्याचे मुख्यमंत्री यादव यांनी स्पष्ट केले आहे.
राजस्थान मुख्यमंत्र्यांचा निर्णय
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही शासकीय खर्च आणि इंधनाच्या बचतीवरून मोठा निर्णय घेतल आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या ताफ्यातील वाहनांची संख्या किमान ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच अनावश्यक वाहनांचा वापर टाळण्याची सूचना केली आहे.
पंतप्रधानांकडून आवाहन
पंतप्रधान मोदींनी अनावश्यक प्रवास कमी करणे आणि राष्ट्रीय साधनसामग्रीच्या बचतीवर जोर देण्याचे आवाहन केले होते. इराण युद्धामुळे निर्माण झालेले ऊर्जा संकट आणि कच्चे तेल महागल्याने पंतप्रधान मोदींनी जागतिक आर्थिक अनिश्चितता, पुरवठासाखळीतील अडथळे आणि महागाईच्या दबावाचा सामना सर्व देशवासीयांनी एकत्र येत करुया असे आवाहन केले होते. तसेच त्यांनी नागरिकांना राष्ट्रासाठी जबाबदार जीवनशैली अवलंबिणे आणि स्थानिक उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. जर आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी आयातीवर निर्भर राहिलो तर देश पुढे कसा जाणार असे प्रश्नार्थक विधानही त्यांनी केले होते.
सोन्याची अनावश्यक खरेदी टाळा
पंतप्रधानांनी एक वर्षापर्यंत सोन्याची अनावश्यक खरेदी टाळणे आणि विदेशी चलन वाचविण्यासाठी विदेश प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. विदेशी चलन साठ्याची बचत देशभक्तीचे कार्य आहे असे म्हणत त्यांनी लोकांना विदेशात सुटी, डेस्टिनेशन वेडिंग न करण्याचे आवाहन केले होते. देशांतर्गत पर्यटन आणि आयोजनांना चालना देण्यावरही त्यांनी जोर दिला होता.
पंतप्रधानांच्या ताफ्यात काय बदलणार?
?पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहनांच्या संख्येत कपात
?हैदराबादमध्ये आवाहन, गुजरात, आसाममध्ये ताफा झाला छोटा
?जेथे शक्य तेथे ताफ्यात ई-वाहनांचा समावेश केला जाणार
?ताफ्याकरता नव्या वाहनांची खरेदी न करण्याची सूचना
Comments are closed.