लोकभवनात पार पडला पोलीस अलंकरण सोहळा, राज्यपालांच्या हस्ते 103 अधिकारी, अंमलदारांचा सन्मान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लोकभवन येथे पोलीस पथक अलंकरण सोहळा आज मोठय़ा दिमाखात पार पडला. या सोहळ्यादरम्यान राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते 103 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदक, शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.

अलंकरण सोहळ्यामध्ये 2022-23 या वर्षांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तसेच 2023-24 या वर्षांच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेली पोलीस पदके प्रदान करण्यात आली. या वेळी 2 पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस शौर्य पदक, 18 जणांना शौर्य पदक, 3 अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, 4 अधिकारी व अंमलदारांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक, 40 अधिकारी व अंमलदारांना पोलीस पदक व 36 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक प्रदान करण्यात आले. या अलंकरण सोहळ्यामध्ये मीरा-भाईंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय, विशेष पोलीस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) प्रवीण कुमार पडवळ व विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके) निशिथ मिश्र या अलंकृत अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अतिरिक्त पोलीस महासंचालक (एटीएस) नवल बजाज, पोलीस अधिकारी, सन्मानित पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Comments are closed.