CJP च्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली.

परवानगी मिळविण्यासाठी संयोजकांकडून अल्टिमेटम : पुन्हा निदर्शनांचा इशारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (सीजेपी) दिल्ली पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जंतर मंतर येथील आंदोलनाची तारीख न दिल्यास, आम्ही पुन्हा आंदोलन करू, असे त्यात म्हटले आहे. सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी आंदोलनासाठी परवानगी मागण्याकरिता सोमवारी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला भेट दिली. मात्र, दिल्ली पोलिसांनी आता जंतर मंतरवर आंदोलन करण्यास पूर्णपणे मनाई केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी अजूनही आंदोलन करण्यावर ठाम आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा मिळेपर्यंत दिल्लीत आंदोलन करण्याची तयारी सीजेपीने दर्शवली आहे. याचदरम्यान आता सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी अटकेचा व्हिडिओ संपादित करून प्रसिद्ध केल्याचे दीपके यांनी म्हटले आहे. ‘तुमच्यात हिंमत असेल तर मला पूर्ण व्हिडिओ दाखवा.’ असे आव्हानच त्यांनी दिले आहे. दीपके यांच्या म्हणण्यानुसार, आजीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या चुलत भावाशी बोलण्याची परवानगी मागितली होती. त्यांनी दोन मिनिटांच्या फोन कॉलचीही मागणी केली, पण पोलिसांनी नकार दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

अभिजीत दीपके, रांका आणि दास यांना शनिवारी दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्याकरिता ते जंतर मंतरकडे जात होते. रविवारी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर तिघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली. न्यायालयाने वर्षभर शांतता भंग न करण्याची अटही सीजेपीच्या नेत्यांना घातली आहे.

Comments are closed.