पोलीस डायरी – मुंबई क्राईम ब्राँचची गोव्यात धडक, सायबर माफियांकडून बेरोजगार तरुणांचा वापर
>>प्रभाकर पवार
सायबर फ्रॉड, बेकायदेशीर ऑनलाईन गेमिंग आणि बेटिंगमधून जमा झालेली कोट्यवधींची रक्कम परदेशात (क्रिप्टो व बिटकॉइन करन्सीद्वारे) पाठवली जात आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर मुंबई क्राईम ब्राँचचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, कृष्णकांत उपाध्याय, राजतिलक रौशन, सदानंद राणे या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा युनिट क्र. २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी प्रशांत गावडे, शेलार, कुलकर्णी, अमित शेख, संकल्प मोकळ या आपल्या पथकाला सोबत घेऊन गेल्या आठवड्यात गोवा येथील एका रिसॉर्टवर छापा मारला असता तिथे १२ तरुण आढळून आले. त्या तरुणांकडून मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी १५ लॅपटॉप, १२८ एटीएम कार्ड, ८५ मोबाईल फोन, ७६ सिमकार्ड, विविध बँकांचे २२ चेकबूक, ७७ पासबूक आदी यंत्रसामुग्री जप्त केली. या कारवाईत घाटोळ, सावंत, राणे, पवार, थिटमे, सय्यद, घरत, आव्हाड, बोटके, सिंह, महिला शिपाई प्रियंका क्षीरसागर, कळसाने, शिंदे या स्टाफनेही भाग घेतला होता.
मुंबई क्राईम ब्राँचने गोव्यात जाऊन सायबर फ्रॉडचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क उद्ध्वस्त केले. मुंबई डिटेक्टशन क्राईम ब्राँच व सायबर क्राईम सेलकडून अधूनमधून अशा कारवाया होत असतात. ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतात, त्या बँक खातेदारांना पैशांचे आमिष दाखविले जाते, त्यांना पकडले जाते. परंतु कंबोडिया, म्यानमार, लाओस आदी देशांत (बनावट शेल कंपन्यांच्या नावावर बँक खाते उघडलेल्या) असलेल्या कंपन्यांमध्ये क्रिप्टो किंवा बिटकॉइन करन्सीद्वारे पैसे वळते करून घेणारे सायबर माफिया पकडले जात नाहीत. अलीकडे महाराष्ट्र सायबर सेलने गेल्या महिन्यापासून ‘ऑपरेशन १९३०’ हाती घेतल्यानंतर मात्र सायबर गुन्हेगारांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा कमिशनचे आमिष दाखवून उघडण्यात आलेली २-३ हजार बनावट बँक खाती उघडकीस आणली आहेत. गुन्हेगारांनी बँक खात्यात जमा केलेल्या पैशांना ‘money mule’ म्हणतात. अशी गुन्हेगारांनी वापरलेली ‘मनी म्युल’ बँक खाती गोठवून महाराष्ट्र सायबर सेलने अलीकडे सुमारे ५०० कोटी रुपये वाचविले आहेत. त्यातील २६ कोटी रुपये फसवणूक झालेल्यांना परत करण्यात आले आहेत.
भारत आज डिजिटल क्रांतीच्या युगातून जात आहे, परंतु त्याच वेगाने सायबर गुन्हेगारांनी आपले जाळे देशभर पसरविले आहे. सायबर गुन्हे हा आता केवळ तांत्रिक विषय राहिलेला नाही. तो सामाजिक, आर्थिक आणि मानसिक सुरक्षेचा विषय बनला आहे. ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर, गृहिणी, नोकरीच्या शोधात असलेले तरुण, डिजिटल व्यवहारात नवखे असलेले नागरिक सायबर गुन्हेगारांचे सर्वात मोठे लक्ष्य बनले आहेत. गेल्या काही वर्षांत उदयाला आलेल्या डिजिटल अटकेने तर सर्वसामान्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे. सीबीआय, ईडी, कस्टम अधिकारी किंवा न्यायालयाचा प्रतिनिधी असल्याचे भासवून, मनी लाँडरिंगची भीती दाखवून फसविले जात आहे. ज्येष्ठांना रस्त्यावर आणले जात आहे. एकेकाळी बंदुकीची भीती दाखविणाऱ्याला कोणी घाबरणार नाही, परंतु ईडी, सीबीआयचे नाव घेतल्यावर कोणाचीही गाळण, भंबेरी उडते. धैर्य खचते. त्यानंतर तो माफिया सांगतो तसे केले जाते. बँकेतील लाखो, करोडो रुपये भीती दाखवून माफियांच्या ‘मनी म्युल’ खात्यात जमा केले जातात. अशा पद्धतीचे फ्रॉड आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो, परंतु राज्यकर्त्यांकडून आज हवी तशी जनजागृती केली जात नाही.
आता सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा आणखी एक मार्ग शोधला आहे. वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावर कॅनडा, दुबई, सिंगापूर, युरोप, ऑस्ट्रेलिया आदी देशांत तातडीने भरती आहे. मोठा पगार, व्हिसा हमी, निवास व तिकीट मोफत अशा आकर्षक जाहिराती दिल्या जातात. तरुण मुले अर्ज करतात. त्यांच्याकडून नोंदणी व्हिसा, कागदपत्र पडताळणी, विमा शुल्क अशा नावाखाली हजारो-लाखो रुपये उकळले जातात. काहींना बनावट नियुक्तीपत्रेही दिली जातात. विमानतळावर पोहोचल्यावर किंवा ज्या देशात मुलांना पाठविले जाते, तिथे गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. त्यानंतर सायबर माफिया त्यांचा ऑनलाईन फसवणुकीसाठी वापर करून घेतात, तर काही माफिया मानवी किंवा ड्रग्स तस्करीसाठी वापरतात. बऱ्याच उच्चशिक्षित तरुणांना दुबईसारख्या देशात मजुरीही करावी लागते. आपण पुन्हा मायदेशी परतावे असे वाटले तरी त्यांना ते शक्य होत नाही. कारण त्या तरुणांचे पासपोर्ट जप्त करण्यात आलेले असतात. अशा अडकलेल्या शेकडो तरुणांची मध्यंतरी मुंबई क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी सुटका केली होती. हे सारे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होऊनही सुशिक्षित तरुणांचे डोळे उघडत नाहीत. आपल्या देशात नोकरी नाही, रोजगाराचा भस्मासूर वाढल्याने अलीकडे कुठेही कंगाल देशात नोकरीसाठी मुले जातात आणि आपले सर्वस्व गमावून बसतात.
वर्तमानपत्रातील किंवा सोशल मीडियातील जाहिरातींची खातरजमा केल्याशिवाय विश्वास ठेवणे धोक्याचे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे, नाहीतर तुमच्यावर कोणता बाका प्रसँग ओढवेल याची खात्री देता येणार नाही. मुंबई क्राईम ब्राँचचे धडाडीचे सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सायबर माफियांविरुद्ध अलीकडे सुरू केलेली कारवाई प्रशंसनीय आहे. गोव्यात पकडण्यात आलेल्या एकाच टोळीकडे ७ हजार ५०० बनावट बँक खाती आढळून आली आहेत. यावरून आपल्या देशवासियांची किती लूट केली जात आहे. अशा किती टोळ्या देश-विदेशात असतील याचा विचार करा. बँक व्यवस्थापन निष्क्रिय असेल, बँक खाती पुरविणाऱ्या टोळ्या सक्रिय असतील तर आणखी काय होणार?
Comments are closed.