नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांना पाठबळ देणार्‍या पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांची तडकाफडकी बदली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

परभणी जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक आणि इतर अवैध धंदे सुरु होते. याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे जबाबदार असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीही यात सामील असल्याचे सांगण्यात आले. या तक्रारींची वरिष्ठ पातळीवर शहानिशा करण्यात आली. त्यानंतर गुरुवारी रात्री गजेंद्र सरोदे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांना नांदेडच्या पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे. तसेच गुन्हे शाखेतील आठ पोलीस अंमलदारांचीही परभणी पोलीस मुख्यालयात बदली झाली आहे.

सध्या नांदेड परिक्षेत्रात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ राबवले जात आहे. या अंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. असे असताना १६ जून रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे काही गंभीर तक्रारी आल्या. या तक्रारी परभणी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांसंदर्भात होत्या.

या तक्रारींची प्रथमदर्शनी चौकशी करण्यात आली. त्यात या अवैध व्यवसायांना पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे हेच जबाबदार असल्याचे उघड झाले. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली. त्यानंतर सरोदे आणि त्यांच्या आठ अंमलदारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

आता या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. त्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. भोकर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील या समितीच्या प्रमुख असतील. येत्या काही दिवसांतच ही चौकशी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा लागेल. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हे आदेश दिले आहेत. वरिष्ठ पातळीवरून झालेल्या या कठोर कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.