Share Market News – शेअर बाजाराला ‘जोर का झटका…’; IT शेअर्समध्ये त्सुनामी, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाल्यानंतर शेअर बाजार मोठी झेप घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, अमेरिकेच्या फेडरलने जाहीर झालेल्या निकालांमुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली आणि बाजारात मोठी घसरण दिसून आली. तसेच Jefferies आणि Accenture ने दिलेल्या अहवालामुळे आयटी क्षेत्रात त्सुनामी आली असून आयटी शेअर्स भुईसपाट झाले आहेत.
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स बाजार सुरू होताच ८०० हून अधिक अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २०० अंकांच्या मोठ्या घसरणीसह उघडला. या बाजारातील घसरणीत आयटी आणि टेक स्टॉक्सना सर्वाधिक फटका बसला. इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस आणि एचसीएल टेक यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स बाजाराच्या सुरुवातीलाच कोसळले.
गेल्या चार दिवसांपासून बाजारात चांगली तेजी दिसत होती. त्यामुळे बाजार आता नवे विक्रम नोंदवेल अशी शक्यता होती. मात्र, शुक्रवारी शेअर बाजार उघडताच दोन्ही निर्देशांक कोसळले. बीएसई सेन्सेक्स ७६,८५२ अंकांवर उघडला, जो त्याच्या आदल्या दिवसाच्या ७७,४०९ च्या बंद भावापेक्षा 800 अंकांनी घसरला होता. त्यानंतर घसरणीला अचानक वेग आला. निफ्टीही मागील बंद भावाच्या २४,१६८ वरून घसरून २३,९९१ वर उघडला आणि त्यानंतर जवळपास २२० अंकांनी घसरून २३,९३९ वर आला.
शेअर बाजारातील या घसरणीत आयटी आणि टेक स्टॉक्सनी सर्वात मोठी भूमिका बजावली. बीएसईच्या लार्ज-कॅप श्रेणीमध्ये इन्फोसिस शेअर (८.५०%), टीसीएस शेअर (६.२०%), टेक महिंद्रा शेअर (५.६०%), एचसीएल टेक शेअर (५.४०%) यांचा समावेश होता, ज्यात मोठी घसरण दिसून आली. घसरणीसह उघडलेल्या इतर प्रमुख शेअर्समध्ये एचडीएफसी बँक शेअर (२.३०%), म्फासिस शेअर (६.६०%), प्रेझेंट शेअर (५%), कोफोर्ज शेअर (४.२०%) आणि डिक्सन शेअर (२.२०%) यांचा समावेश होता.
जागतिक बाजारातून आलेल्या संमिश्र संकेतांमुळे, शुक्रवारी निफ्टी २४,००० च्या खाली घसरला. अंदाजे ९५६ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह उघडले, तर १,३२४ स्टॉक्स मोठ्या घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. याशिवाय, १७८ स्टॉक्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
Jefferies आणि Accenture च्या अहवालाने चिंता वाढली
जागतिक आयटी सेवा कंपनी ॲक्सेंचरने पश्चिम आशियातील महसुलाच्या आव्हानांचा हवाला देत आर्थिक वर्ष २०२६ साठीचा आपला महसूल वाढीचा अंदाज कमी केल्यानंतर शेअर बाजारात ही घसरण झाली आहे. या कंपनीचा स्टॉक रातोरात जवळपास १८ टक्क्यांनी घसरला, तर इन्फोसिस एडीआर जवळपास १० टक्क्यांनी आणि विप्रो एडीआर ३.६ टक्क्यांनी घसरला.
शेअर बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. ॲक्सेंचरच्या वृत्तामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री (selloff) झाली. जागतिक सल्लागार कंपनी ॲक्सेंचरने व्यक्त केलेल्या सावध दृष्टिकोनामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. यामुळे बाजार उघडताच गुंतवणूकदारांची सुमारे २ लाख कोटी रुपयांची संपत्ती (मार्केट कॅप) नष्ट झाली आणि संपूर्ण आयटी क्षेत्रातील शेअर्स खाली आले.
ॲक्सेंचरने आपल्या वार्षिक महसूल वाढीच्या अंदाजाची मर्यादा कमी केल्यामुळे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) चर्चा वाढूनही ग्राहक तंत्रज्ञानावरील खर्च वाढवण्यास कचरत असल्याचा इशारा दिल्याने, अनेक मध्यम आकाराच्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाली. या घसरणीचा फटका संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्राला बसला. कोफोर्ज (Coforge), हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, सोनाटा सॉफ्टवेअर, टाटा एल्क्सी आणि केपीआयटी (KPIT) टेक्नॉलॉजीजचे शेअर्सही मोठ्या घसरणीसह व्यवहार करत होते.
अनेक ब्रोकरेजेसनी अॅक्सेंचरच्या निकालांना भारतीय आयटी क्षेत्रासाठी एक नकारात्मक संकेत मानले. सिटीने नमूद केले की, डॉलरच्या तुलनेत अॅक्सेंचरची मागील १२ महिन्यांची बुकिंग ५ टक्क्यांनी वाढली असली तरी, ब्रोकरेज फर्म या क्षेत्राबाबत सावध आहे. Nomura ने इशारा दिला आहे की, भू-राजकीय अनिश्चिततेचा परिणाम तंत्रज्ञानावरील खर्च आणि नवीन कंत्राटांवर (deal bookings) आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत आणि कदाचित त्यानंतरही होऊ शकतो. या ब्रोकरेजने ‘लार्ज-कॅप’ तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये Infosys आणि Cognizant यांना पसंती दिली आहे, तर लहान कंपन्यांमध्ये Coforge आणि eClerx यांची निवड केली आहे.
Jefferies ने मात्र सर्वात सावध भूमिका घेतली आहे. ब्रोकरेजने म्हटले आहे की, Accenture कडून अंदाजांत पुन्हा कपात केल्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांच्या कमाईच्या (earnings) अंदाजांत आणखी कपात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, गुंतवणूकदार या क्षेत्राच्या दीर्घकालीन वाढीचा वेग आणि ‘व्हॅल्युएशन मल्टिपल्स’ (मूल्यमापन गुणक) यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
Comments are closed.