महायुतीत सावळा गोंधळ; पुण्यात अजितदादा गटाचे दोन अर्ज, छत्रपती संभाजीनगरात सत्तार कोपले, यवतमाळमध्ये भाजपचे बंडखोर, रायगडात तटकरेंची कोंडी
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-शिंदे आणि अजित पवार गटाने आठ ते नऊ ठिकाणी एकमेकांच्या विरोधात अर्ज दाखल केल्याने महायुतीत पुरता सावळागोंधळ उडाला आहे. पुण्यात अजितदादा गटाकडूनच दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांनी मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजपविरोधात बंड पुकारले आहे, तर यवतमाळमध्ये शिंदे गटाविरोधात भाजपच्या नितीन भुतडा यांनी अर्ज दाखल करत शड्डू ठोकला आहे. रायगडमध्ये शिंदे गटाचा अजितदादा गटाच्या अनिकेत तटकरेंना पाठिंबा असला तरी आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने अर्ज दाखल केल्याने तटकरेंचे टेन्शन वाढले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदारात पाडून घेण्यासाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू होती. तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या दिल्लीच्या वारीनंतर रविवारी रात्री भाजप 11, शिंदे गट 4 आणि अजित पवार गट 2 असा जागावाटपाचा फॉर्म्युला महायुतीकडून जाहीर करण्यात आले. यामध्ये रायगड आणि पुण्याची जागा अजितदादा गटाला सुटलेली आहे. मात्र, रायगडमध्ये शिंदे गटाच्या जुईली दळवी आणि पुण्यात भाजपचे प्रदीप कंद यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान महायुतीच्या नेत्यांपुढे आहे.
महायुतीकडून ठाण्यातून शिंदे गटाच्या रवींद्र फाटक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपकडून वर्धा-चंद्रपूर अरुण लखाणा, भंडारा-गोंदीया अविनाश ब्राम्हणकर, सांगली-सातारा धैर्यशील कदम, सोलापूर राजेंद्र राऊत, अहिल्यानगर प्राजक्त तनपुरे, धाराशीव-बीड बसवराज पाटील, नागपूर डॉ. राजीव पोतदार यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
यवतमाळ, परभणीमध्ये शिंदे गटापुढे मित्र पक्षांचेच आव्हान
यवतमाळमध्ये शिंदे गटाच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात भाजपचे नितीन भुतडा आणि अजित पवार गटाच्या साजिद बेग यांनी अर्ज दाखल केला आहे, तर परभणीत शिंदे गटाच्या सईदा खान यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या विजय जामकर आणि जिल्हा परिषद सदस्य संग्राम जामकर यांनी बंडखोरी केल्याने शिंदे गटापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
नांदेडमध्ये चिखलीकरांचे बंड
नांदेडमध्ये भाजपकडून अशोक चव्हाण समर्थक अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपला मुलगा प्रवीण याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवून बंड पुकारले आहे.
कॉँग्रेसकडून अतुल लोंढे, शैलेश अग्रवाल, करण ससाणेंसह नऊ जणांचे अर्ज दाखल
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. नागूपरमधून अतुल लोंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्धा-चंद्रपूर शैलेश अग्रवाल, अहिल्यानगर करण ससाणे, सोलापूर आदित्य फतेपूरकर, भंडारा-गोंदिया वामन बनसोड, यवतमाळ साहेबराव कांबळे, अमरावती हर्षदीप देशमुख, लातूर-बीड महेश देशमुख, नांदेड रामदास पाटील सुखटणकर यांनी कॉँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून हे रिंगणात
महविकास आघाडीच्या जागावाटपात ठाणे, पुणे आणि सातारा-सांगलीची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाटय़ाला आली आहे. ठाण्यातून राष्ट्रवादीने अभिजित पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पुण्यातून श्रीकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. सातारा-सांगलीत राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पाटील आणि अभय जगताप यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या दोघांपैकी एक अर्ज कायम ठेवण्यात येणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पवार यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेना शहरप्रमुख अनिष गाढवे, नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज प्रधान आदी उपस्थित होते.
पुण्यात काकडे, टिंगरेंचे अर्ज
पुणे विधान परिषदेसाठी ऐनवेळी पक्षप्रवेश करणाऱया विक्रम काकडे यांनी अजितदादा गटाकडून अर्ज भरलाय, तर त्यांच्याच पक्षाच्या सुनील टिंगरे यांनीदेखील अर्ज दाखल केलाय. काकडे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर टिंगरे त्यांचा अर्ज मागे घेतील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दिलीप वळसे-पाटील यांनी काकडे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले.
या ठिकाणी भाजपविरोधात शिंदे गटाचे बंड
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या सुहास शिरसाठ यांच्याविरोधात शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी बंडखोरी केली आहे. अमरावतीत भाजपच्या प्रवीण पोटे यांच्याविरुद्ध शिंदे गटाच्या विप्लव बाजोरीया यांनी, तर जळगावमध्ये भाजपच्या नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात शिंदे गटाच्या रेश्मा काळे, दीपक धांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंड पुकारले आहे.
नाशिकमध्ये शिंदे गटाच्या दराडेंची कोंडी
नाशिकची जागा महायुतीच्या जागावाटपात शिंदे गटाला सोडण्यात आली आहे. येथून शिंदे गटाने माजी आमदार नरेंद्र दराडे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक माजी नगरसेवक गोकूळ गिते आणि त्यांचे बंधू गणेश गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत दराडेंची कोंडी केली आहे.
शिवसेकडून बाळ माने, देवयानी डोणगावकर, शरद तायडे, विवेक नावंदर मैदानात
शिवसेनेकडून रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून बाळ माने, छत्रपती संभाजीनगरमधून देवयानी पाटील-डोणगावकर, जळगावातून शरद तायडे आणि परभणी-हिंगोली मतदारसंघातून डॉ. विवेक नावंदर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. या चारही उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजप मित्रपक्षांचे मुंडके उडवते – सत्तार
भाजप मित्रपक्ष असणाऱया शिंदे गटाचा मुंडके उडवण्याचे काम करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे. भाजप आमच्या पक्षात गटतट पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकेच तोडून टाकले आहे, असा संताप अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
Comments are closed.