लाडक्या बहिणींची छाननी सुरू, फडणवीसांची ‘कॅग’ची ढाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ई-केवायसी प्रक्रियेत 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. त्यानंतरही छाननी सुरूच असून वर्षभरात आणखी 60 लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्याची सरकारची योजना असल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगची बचावासाठी केली असून कॅगच्या निकषामुळेच या योजनेची सखोल छाननी करावी लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या केवायसीनंतर 80 लाखांनी कमी झाली. त्यानंतर या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 1 कोटी 66 लाखांवर आली आहे. आगामी काळात छाननीत त्यातील आणखी 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी पोरक्या होऊ शकतात अशी भीती विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या छाननीवरून सरकारवर टीका केली आहे. महायुती सरकार आता निवडणुकीनंतर लाखो लाडक्या बहिणींना अपात्र करत आहे. इतक्या महिला अपात्र होत्या तर त्यांना 19-20 महिने अनुदान कसे मिळाले? असा सवाल उपस्थित करतानाच, टप्प्याटप्प्याने योजनाच गुंडाळण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला, तर लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे त्रास दिला किंवा पैसे परत घेण्याची भाषा केली तर सरकारला महागात पडेल. 15 हजार कोटीची वसुली करायचीच असेल तर मंत्री आणि अधिकाऱयांकडून करावी, असे आमदार रोहित पवार म्हणाले.

कॅगकडून विचारणा होते म्हणून छाननी – फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या छाननीमागे कॅग असल्याचा दावा केला आहे. कॅगकडून योजनेचे ऑडिट केले जाते आणि योजनेची पडताळणी केली की नाही याबद्दल विचारणा होते, त्यामुळे पडताळणी करावी लागते आणि त्यात निकषात न बसणाऱया महिला अपात्र ठरल्या गेल्या. अपात्र महिलांना मानधन देत राहिलो तर कॅगकडून विचारणा होईल आणि दिलेले मानधन वसूलही करायला लावतील, पुरुष सोडून ज्या महिला अपात्र असताना मानधन घेत होत्या त्यांना माफी देऊन काहीही वसुली करणार नाही. पण अपात्र महिलांना मानधन देत राहिलो तर वसुली करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.

लाडक्या बहिणींचा तळतळाट लागेल

निवडणुकीआधी वाजतगाजत लाडकी बहीण योजना आणणाऱया महायुती सरकारने सत्ता आल्यावर याच बहिणींचा विश्वासघात केला. बहिणींना अपात्र ठरवून सत्ताधारी भाऊ मजा मारत आहे, महाराष्ट्र लुटत आहे, या सरकारला लाडक्या बहिणींचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही, असा संताप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Comments are closed.