म्हाडाच्या मुंबईतील एका घरासाठी 28 अर्जदारांमध्ये स्पर्धा, विधान परिषद निवडणुकीनंतर लॉटरीचे वेळापत्रक जाहीर होणार
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2,640 घरांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी 75,366 अर्ज प्राप्त झाले आहे. म्हणजेच एका घरामागे 28 अर्जदारांत स्पर्धा असणार आहे. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आचारसंहिता लागू असून आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई मंडळाने 30 मार्च रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांसाठी 2,640 सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर केली होती. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 858, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 839 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 10 जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 12 जूनपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येतील. त्यानंतर 16 जूनला स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Comments are closed.