केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची अशीही कारवाई, ‘बार’ वाचवण्यासाठी डोंबिवलीतील धोकादायक इमारत अर्धवट पाडली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

डोंबिवलीच्या सुभाष रोड येथील बेकायदा आकाश बार व श्रीकृष्णा व्हेज रेस्टॉरंट वाचवण्यासाठी भाऊराव सदन ही धोकादायक इमारत अर्धवट पाडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या अजब कारवाईची सर्वत्र चर्चा असून २७ भाडेकरूंनी मात्र पालिकेच्या बेफिकीर कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करून बार व हॉटेलला टाळे ठोकावे आणि त्यास पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे भाऊराव सदन रहिवासी संघाने केली आहे.

डोंबिवलीतील भाऊराव सदन ही तळ अधिक चार मजल्यांची इमारत आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी ही इमारत धोकादायक (सी १) असल्याचे जाहीर करून जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पालिकेचे पथक येऊन धडकले, पण प्रत्यक्षात केवळ तीन मजले तोडण्यात आले. तळ मजल्यावर आकाश बार व श्रीकृष्ण व्हेज रेस्टॉरंट असून पहिल्या मजल्यावरही काही गाळे आहेत. ते न तोडता ही बांधकामे अधिकाऱ्यांनी वाचवली. इमारत जमीनदोस्त केल्यानंतर बेघर झालेल्या भाडेकरूंनी आपली तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे.

भाऊराव सदन या इमारतीचा पुनर्विकास करण्याची प्रक्रियादेखील काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. पण पूर्ण इमारत जमीनदोस्त न केल्याने अनेक अडथळे आले आहेत. आकाश बारचा मालक अशोक शेंडकर याने बोगस कागदपत्रे सादर करून परवाना घेतला होता. पण ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी २०१३ मध्येच हा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. तरीदेखील अद्यापपर्यंत हा बार सुरूच असल्याचा आरोप रहिवासी रखमा पोखरकर व विजय भोईर यांनी केला आहे.

सहाय्यक आयुक्तांची मिलीभगत असल्याचा आरोप

एखादी इमारत धोकादायक जाहीर केल्यानंतर ती पूर्णपणे तोडण्यात येते. पण डोंबिवलीतील भाऊराव सदन इमारत मात्र बीयर बार वाचावा यासाठी अर्धवट तोडली असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे. पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची मिलीभगत असल्याचा आरोप भाडेकरूंनी केला आहे. या बारला तत्काळ सील ठोकावे, बीयर बारला अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि संबंधित बारमाल कावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे

Comments are closed.