शेतात घाम गाळून, काबाडकष्ट करून पै-पै जमवला; पोस्टमास्टरनं तब्बल सव्वा कोटी रुपयांवर डल्ला मारल
पोस्ट ऑफिस घोटाळा: सहकारी आणि राष्ट्रीयकृत बँकेपेक्षाही ज्या पोस्ट विभागातील (Post Office) बचत व इतर खात्यांना लोक जास्त सुरक्षित मानतात, पोस्ट विभागातील ज्या वेगवेगळ्या गुंतवणूक योजनेमध्ये मोठ्या विश्वासाने गुंतवणूक करतात, त्याच पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांनी एक-दोन नव्हे तर शेकडो शेतकरी आणि शेतमजुरांना कोट्यवधी रुपयांचा दणका (Scam) दिला आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील दिग्रस ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा (Post Office Scam) झाल्याचे आरोप होत आहे. या ब्रांच पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या दिग्रससह वंडली, येरळा धोटे, हरमखोरी या गावातील शेकडो कुटुंबांचे बचत खात्यासह आरडी आणि एफडी खाते दिग्रस येथील ब्रांच पोस्ट ऑफिस मध्ये होते.
मोलमजुरी करून मेहनतीने कमावलेल्या छोट्या छोट्या रकमा गावकरी पोस्ट खात्यात मोठ्या विश्वासाने जमा करत होते. मात्र 2022 पासून या ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्टर म्हणून कार्यरत असलेल्या सिंधुबाई बाळबुधे या महिला अधिकाऱ्याने सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे.
Post Office Scam : खातेदारकांना खोट्या पावत्या, स्वतःच्या हस्ताक्षराने खोट्या एन्ट्री
दरम्यान, या प्रकरणी गावकऱ्यांचा आरोप आहे की, सिंधूबाई बाळबुधे यांनी गोड बोलून गावकऱ्यांचा विश्वास संपादित केलं आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या शेकडो कुटुंबीयांच्या पासबुक स्वतःकडे ठेवून घेतल्या. 2022 पासून गावकऱ्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या खात्यात जमा केलेली रक्कम सिंधुबाई यांनी स्वीकारली. त्या मोबदल्यात पोस्टाची खरी पावती न देता खातेदारकांना खोट्या पावत्या दिल्या.
पासबुकमध्ये स्वतःच्या हस्ताक्षराने खोट्या एन्ट्री केल्या. यावर्षी गरजेच्या वेळेला जेव्हा काही गावकऱ्यांनी आपल्या बचत, आरडी किंवा एफडी असलेल्या खात्यातून रक्कम काढण्यासाठी अर्ज दिले, तेव्हा सुरुवातीला सिंधुबाई यांनी टाळाटाळ केली. मागणी करूनही अनेक दिवस गावकऱ्यांना त्यांच्या पासबुक दिल्या नाही. जेव्हा काही लोकांनी पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा काहींचे पासबुक सोपवण्यात आले आणि गेले तीन वर्ष गावकऱ्यांच्या मेहनतीच्या पैसा त्यांच्या खात्यात किंवा पोस्टात न जमा होता, त्याचा परस्पर अपहार केले जात असल्याचे उघड झाले.
Crime News : काटोल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
गावकऱ्यांनी एक महिन्यापूर्वी पोलिसांकडे या संदर्भातील तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी तेव्हा गांभीर्याने घेतले नाही. मात्र तक्रार करणाऱ्यांची संख्या जेव्हा शेकडोमध्ये पोहोचली, अपहाराची रक्कम सव्वा कोटीपर्यंत वाढली तेव्हा पोलीसही खडबडून जागे झाले. काटोल पोलीस स्टेशनमध्ये सिंधुबाई बाळबुधे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काल रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सिंधी उमरी येथील पोस्ट ऑफिसमधील अधिकाऱ्याने ही अशाच पद्धतीने एक कोटींचा अपहार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात पोस्टातील अधिकाऱ्यांनी भोळ्या भाबड्या ग्रामीण जनतेला फसवण्याचा सपाटा लावला आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.
Post Office Scam : पोस्टातील घोटाळ्यासंदर्भात गावकऱ्यांचे आरोप काय?
– गेल्या अनेक महिन्यांपासून पासबुक मागून ही आरोप लागलेली महिला अधिकारी पासबुक देत नव्हती.
– बचत खात्यात पैसे डिपॉझिट करायला गेले असता डिपॉझिट स्लीप वर स्वाक्षरी घेण्याऐवजी विड्रावल स्लीपवर स्वाक्षरी घेऊन परस्पर पैसे काढले.
– आरडी अकाउंटमध्ये पैसे न टाकता परस्पर स्वतःकडे ठेवले. आरडी अकाउंटमधील पैसे टाकल्याच्या पावत्या दिल्या नाही.
– पोस्टाच्या अत्यंत लोकप्रिय सुकन्या योजनेतही मोठ्या प्रमाणावर घोळ करत मजुर महिलांनी त्यांच्या मुलींच्या नावावर जमा केलेले पैसेही घोटाळेबाज महिला अधिकाऱ्याने लंपास केले.
-एफडी खात्याच्याअनेक खातेधारकांच्या डुप्लिकेट पासबुक बनवून त्यावर खोट्या एन्ट्री करून ती एफडी धारकांना दिली आणि खरी पासबुक स्वतःकडे ठेवून एफडीचे पैसे परस्पर काढून स्वतःकडे ठेवले.
-लोकांनी दबाव आणलं तर अनेकांना पासबुक दिल्या. मात्र डुप्लिकेट पासबुक दिल्या. त्यामध्ये नाव एकाचा, फोटो वेगळ्याच व्यक्तीचा आणि अकाउंट मधील माहिती तिसऱ्याच व्यक्तीची आढळली.
आणखी वाचा
Comments are closed.