भाजपमध्ये प्रवेश करताच प्रज्ञा सातवांकडून देवाभाऊंचं कौतुक, काँग्रेस सोडण्याबाबत चकार शब्दही ना

प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश राजीव सातव यांचं हिंगोलीच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राच्या चौफेर विकासाला हातभार लावण्यासाठी मी आणि माझे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहोत, असे प्रतिपादन काँग्रेसच्या (Congress) माजी आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांनी केले. हिंगोलीतील (Hingoli news) काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने कालपासून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज सकाळी प्रज्ञा सातव यांनी विधिमंडळ सचिवांकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द करत रितसर भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. प्रज्ञा सातव या काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची बातमी समोर आल्या क्षणापासून त्यांनी हा निर्णय का घेतला, असा एकच प्रश्न विचारला जात होता. त्यावर प्रज्ञा सातव यांनी विकासाचे कारण पुढे केले. (Maharashtra Politics news)

मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या परिवारात सामावून घेतले, यासाठी मी मनापासून तुम्हा सर्वांना धन्यवाद देते. साहेब माझे पती सर्वांचे लाडके दिवंगत खासदार  राजीव सातव हे हिंगोलीचे भूमीपूत्र होते. त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या मातोश्री रजनीताई सातव यांनीही हिंगोलीच्या विकासासाठी आजीवन काम केले होते. त्या दोघांसोबत राहून मी गेली 20 वर्षे एनजीओ, शिक्षणसंस्थांमध्ये काम करत होते. साहेबांच्या निधानंतर मला 2021 साली विधिमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मला सर्वांचं सहकार्य मला लाभलं. मी आज इथवर येण्याचा माझ्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रज्ञा सातव यांनी म्हटले.

माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, राजीव सातव यांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राचा चौफेर विकास घडत आहे त्यामध्ये आम्हाला साथ द्यायची असल्याने आम्ही भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. राजीवभाऊंचे आशीर्वाद, देवाभाऊंची साथ, सर्वजण मिळून करु संकटांवर मात. मी एवढंच आश्वासन देते की, मी आणि माझे कार्यकर्ते हे, सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास या धोरणाने काम करत राहू, असेही प्रज्ञा सातव यांनी सांगितले.

आणखी वाचा

प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामागे अशोक चव्हाण असल्याची चर्चा; प्रश्नावरती थेट म्हणाले, ‘अनेक दिवसापासून त्यांच्यासोबत…’

आणखी वाचा

Comments are closed.