तुम्ही एफआयआर नोंदवत नसाल तर सुप्रीम कोर्टाला पत्र पाठवू का? प्रकाश आंबेडकर पुणे पोलिसांवर इशार
पुणे दलित मुलींचा छळ: प्रकाश आंबेडकर: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली होती. तब्बल 24 तास उलटून गेल्यानंतरही पुणे पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही. रविवारी रात्री रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. पहाटे साडेतीन वाजेपर्यंत हे सगळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. तरीही पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे चांगलेच संतापले. त्यांनी कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावून याबद्दल जाब विचारला.
प्रकाश आंबेडकर यांनी कदम नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावला होता. मात्र, हा अधिकारी एक-दोन दिवसांत एफआयआर दाखल करुन घेऊ, असे सांगत होता. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, एक लक्षात घ्या कदम…. ती मुलगी 25 वर्षांची आहे. कुठलातरी पोलीस औरंगाबादमधून येतो आणि हे सगळ्या कोणाच्यातरी घरात घुसतात. हे पोलीस कोणत्या कायद्याखाली मुलींच्या घरात घुसतात?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला. पोलिसांना कोणाच्या घरात घुसण्याचा परवाना दिलेला नाही ना? त्यामुळे तुम्ही याप्रकरणात मुलींच्या तक्रारीनुसार, एफआयआर नोंदवून घ्या आणि मग त्याचा तपास करा. त्यावर पोलीस अधिकाऱ्याने दोन दिवस थांबा, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांना केली. तेव्हा प्रकाश आंबेडकर काहीसे चिडले. त्यांनी म्हटले की, ‘दोन दिवस नाही ताबडतोब एफआयआर झाली पाहिजे. नाहीतर मी त्यांना सांगतो, धरणं देऊन बसा. कायदा हा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. चौकशी होत राहील, त्यामधून सत्य समोर येईल. पण एफआयआर नोंदवायला पोलिसांचा इतका विरोध का? तुम्ही एफआयआर नोंदवत नसाल तर सुप्रीम कोर्टाला पत्र पाठवू का, अशी विचारणा प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Prakash Ambedkar: कायदा म्हणजे कायदाच असतो: प्रकाश आंबेडकर
औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या. त्यांनी तिला ‘वन स्टॉप सखी सेंटर’मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली. या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती औरंगाबादमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे. यानंतर कोथरुड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. पुणे पोलिस त्या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यांनी मध्यरात्री तीन महिला तक्रारदाराच्या घरात घुसून त्यांना जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केली, असे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
मी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पोलिसांना मिळालेल्या माहितीत जर कुठल्याही संज्ञेय गुन्ह्याचा उल्लेख होत असेल, तर एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. मी ठामपणे सांगितले, कायदा म्हणजे कायदाच असतो! वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समित्यांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले होते. जर पोलिसांनी यानंतरही एफआयआर दाखल केला नाही, तर आम्ही मोठ्या संख्येने एसपी कार्यालयासमोर एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू.
पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अॅट्रोसिटी कायद्याचे महत्त्व, पीडित महिलांचा त्रास समजत नाहीये. गेल्या 15 तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफआयआर नोंदवावी म्हणून लढत आहेत. तरीसुद्धा पोलिस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही. पोलिसांना एवढी भीती कशाची? पोलिस आरोपींना पाठीशी का घालताय? सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालताय? आंदोलनकर्त्यांनी प्रश्न विचारल्यावर पळ काढणे, हे पुणे पोलिसांचे अपयश आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=Y9RO7Q1PPBK
आणखी वाचा
कोथरुडमधील प्रकरण तापलं, ‘त्या’ 3 तरुणींशी रुपाली चाकणकरांची चर्चा; नेमकं काय घडलं?
आणखी वाचा
Comments are closed.