सरनाईक पितापुत्रांनी दहीहंडीच्या स्टेजवरुन राजकीय वचपा काढला; जय जवान मंडळाला टोमणा, म्हण

जय जवान गोविंदा पाठक: मुंबईतील जुन्या आणि मानाच्या गोविंद पथकांपैकी एक असणाऱ्या जय जवान गोविंदा पथक आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांच्यात नुकताच रंगलेला वाद चर्चेचा विषय ठरला होता. जय जवान गोविंदा पथकाने काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा त्यांना दहीहंडी रचून सलामी दिली होती. यामुळे शिंदे गटाच्या प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आयोजित केलेल्या प्रो-गोविंदा स्पर्धेतून जय जवानला (Jai Jawan Govinda Pathak) वगळण्यात आले होते.आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा आरोपही जय जवान पथकाने केला होता. या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या व्यासपीठावरुन या टीकेचा वचपा काढला. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाने (Konkan Nagar Govinda Pathak) दहा थर रचून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यानंतर प्रताप सरनाईक यांनी जय जवान मंडळाला टोमणा मारला.

कोणी काहीही म्हणू द्या, कोणाचीही युती होऊ द्या. काही गोविंदा पथकांना वाटत असतं की, आमचा विश्वविक्रम मोडणार नाही. आम्ही सार्वभौम आहोत. पण कोकण नगर गोविंदा पथकाने दाखवलं की, विश्वविक्रम ही कोणा एकाची मक्तेदारी नसते. विश्वविक्रम हे मोडण्यासाठीच असतात, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख जय जवान गोविंदा पथकाच्या दिशेने होता. जय जवान पथकानेही नऊ थरांचा विक्रम आपल्याच संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रचला होता, असेही प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.

तर पूर्वेश सरनाईक हेदेखील व्यासपीठावरुन सतत आर्यन्स गोविंदा पथक आणि कोकण नगर पथकाचा आवर्जून उल्लेख करत होते. आर्यन्स गोविंदा पथक कशाप्रकारे जागतिक स्तरावर पोहोचले आहे. जागतिक कलाकारांच्या कार्यक्रमात या पथकाला स्थान मिळाले होते, असे पूर्वेश सरनाईक यांनी म्हटले. तर कोकण नगर गोविंदा पथकही प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. मात्र, त्यांनी मला यंदा तुमच्यासाठी 10 थर लावू, अशा शब्द दिला होता. त्यांनी हा शब्द खरा करु दाखवल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी म्हटले. पूर्वेश सरनाईक हे कोकण नगर गोविंदा पथकासोबत जल्लोषात सहभागी झाले होते. यावेळी ‘कडक 10’ असा लहानसा फलक झळकावला. मात्र, आपल्या दहीहंडीत विश्वविक्रम रचल्याचा सरनाईक पितापुत्रांचा आनंद फारकाळ टिकला नाही. कारण, त्यानंतर काहीवेळातच जय जवान पथकाने घाटकोपर येथे मनसेच्या दहीहंडी उत्सवात यशस्वीपणे 10 थर रचले.

https://www.youtube.com/watch?v=zbszrc1mljo

आणखी वाचा

राजकारण करुन प्रो गोविंदा स्पर्धेतून वगळल्याचा जय जवानचा आरोप; आता पुर्वेश सरनाईक म्हणाले…

जय जवाननं दाखवून दिलं गोविंदा पथकांचे राजे आम्हीच! कोकण नगर मंडळानंतर रचले 10 थर

विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला!

आणखी वाचा

Comments are closed.