मला व्हिलन ठरवण्यात आलं, पण एक दिवस जनतेसमोर सत्य मांडणारच; प्रतिभा धानोरकरांचं ‘त्या’ वादावर म
प्रतिभा धानोरकर : चंद्रपूर महानगरपालिकेत (Chandrapur Municipal Corporation) अलीकडे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून ऐनवेळी भाजपचा महापौर निवडून आला. या राजकीय उलथापालथीमागे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. धानोरकर आणि वड्डेटीवार यांच्यातील मतभेदांचा फायदा भाजपने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. चंद्रपूर महानगरपालिका काँग्रेसच्या हातून गेल्यानंतर पक्षावर जोरदार टीका होत आहे. त्यातच आता काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. “मला ‘व्हिलन’ ठरवण्यात आलं, पण एक दिवस सत्य जनतेसमोर मांडणारच” असं चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी म्हटले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस (Congress) व मित्र पक्षाच्या नवनिर्वाचित तसेच पराभूत उमेदवारांसाठी एक ‘स्नेहमिलन सोहळा’ आयोजित केला होता आणि त्याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.
अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत घेतलेल्या भेटीत निवडणुकीदरम्यान आणि सत्ता स्थापनेच्या वेळी प्रतिभा धानोरकर यांच्याकडून वारंवार झालेल्या अपमानाचा उल्लेख केला होता तर दुसरीकडे काँग्रेस पक्षातीलच नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या हातून सत्ता जाण्यामागे खासदार धानोरकरच जबाबदार असल्याचं सूचित केलं होतं. आता प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि विजय वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर मानलं जात आहे.
Pratibha Dhanorkar: मला ‘व्हिलन’ ठरवण्यात आलं, पण…
धानोरकर यांनी जारी केलेल्या प्रेस नोट मध्ये त्यांनी सत्ता स्थापनेच्या घटनाक्रमाचा आणि पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनांचाही उल्लेख केलाय. त्यांच्या मते राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट असताना चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसवर विश्वास टाकला. मात्र, सत्ता स्थापन करताना काही ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या पक्षांनी आणि आपल्याच काही हितशत्रूंनी माझ्याविरोधात कट रचला. मला या संपूर्ण प्रकरणात ‘व्हिलन’ ठरवण्यात आले असले, तरी वेळ आल्यावर मी माझी आपबिती जनतेसमोर नक्कीच मांडेन.
Pratibha Dhanorkar: अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात
दिल्लीत काँग्रेस नेत्या खा. प्रियांका गांधी आणि काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्ट सूचना होत्या की, महापौर आपलाच असावा किंवा आपण प्रबळ विरोधी पक्षात बसावे. पक्ष वाढवण्यासाठी नेते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, मात्र नेत्यांच्या अवतीभवती असणारे काही स्वार्थी कार्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या नेत्यांच्या विरोधात कानभरणी करून गटबाजी निर्माण करतात, हे दुर्दैवी आहे. अशा प्रवृत्तींमुळेच पक्षाच्या हक्काच्या संधी हुकतात.” अशी खंत प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.