पंतप्रधान मोदींनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत
यंदाही सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि निराशेवर आशेचा विजय साजरा करतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा जारी केल्या. तसेच यावर्षीही आपण सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया हँडल ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत ‘हा सण सर्वांना दयाळूपणा पसरवण्यास, सकारात्मकता अंगीकारण्यास आणि उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्यास प्रेरित करेल,’ असे त्यांनी म्हटले आहे. दिवाळीचा पवित्र सण तुम्हा सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो, अशी आपली इच्छा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत सरकारच्या ‘जन संपर्क पोर्टल’वरील पोस्टमध्येही त्यांनी संदेश दिला आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांना एक समृद्ध आणि ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी नवीन ऊर्जा आणि संकल्पास पुढे जाण्याचे आवाहन केले. प्रत्येक भारतीय दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. अशा परिस्थितीत दिवाळीचा सण आपली घरे आणि कुटुंबे सोडून आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर उभे राहणाऱ्या सैनिकांसाठीही महत्त्वाचा असतो. त्यामुळे, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मी आपल्या भारतीय सैन्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांसोबत वेळ घालवणे ही त्यांची परंपरा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Comments are closed.