पंतप्रधान आजपासून परदेश दौऱ्यावर.
युएईसोबतच युरोपीय देशांना भेट देणार : व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण क्षेत्रांना बळकटी मिळणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवार, 15 मे रोजी संयुक्त अरब अमिरातीसह युरोपीय देशांच्या भेटीवर रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण आदी क्षेत्रांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती विदेश सचिव सीबी जॉर्ज यांनी गुरुवारी दिली. पंतप्रधान मोदी 15-20 मे दरम्यान युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील संकटादरम्यान ते प्रथम युएईला पोहोचतील. तेथे ऊर्जा सुरक्षा आणि क्षेत्रीय स्थितीवर चर्चा करत द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्याचा प्रयत्न ते करतील. युएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या भेटीत ऊर्जा सहकार्य, क्षेत्रीय स्थिती आणि भारत-युएई व्यापक रणनीतिक भागीदारीवर चर्चा होणार आहे. भारताचा तेलपुरवठा आणि ऊर्जा सुरक्षा पाहता या दौऱ्याला अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
नेदरलँडचा दौराही ठरणार महत्त्वपूर्ण
युएईच्या भेटीनंतर पंतप्रधान नेदरलँडमध्ये पोहोचतील. दोन दिवसांच्या नेदरलँड दौऱ्यात पंतप्रधान रॉब जेटन, राजे विलेम-अलेक्झांडर आणि महाराणी मॅक्सिमा यांना भेटणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून संरक्षण, सुरक्षा, ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर आणि जलसुरक्षा तंत्रज्ञानावर चर्चा करतील. त्यांच्या हा दुसरा नेदरलँड दौरा असून यापूर्वी त्यांनी 2017 मध्ये भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17-18 मे या कालावधीत स्वीडन आणि 18-19 मेदरम्यान नॉर्वेच्या दौऱ्यावर असतील. नॉर्वेच्या ओस्लोमध्ये 19 मे रोजी तिसरी इंडिया-नॉर्डिक परिषद आयोजित होणार आहे. या परिषदेत ग्रीन ट्रान्जिशन, ब्ल्यू इकोनॉमी, संरक्षण, अंतराळ आणि नव्या तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे.
अखेरच्या टप्प्यात इटलीला भेट
दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी हे 19-20 मेदरम्यान इटलीच्या दौऱ्यावर दाखल होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्रपती सर्जियो मातारेला यांच्याशी ते थेट चर्चा करतील. तर द्विपक्षीय बैठकांध्ये भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करार, संरक्षण सहकार्य आणि स्वच्छ ऊर्जेवर चर्चा होणार असल्याही विदेश व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
Comments are closed.