ज्या पृथ्वी शॉला आयपीएलने नाकारले, तो पठ्ठ्या आता बनला आयकॉन खेळाडू; सूर्या, अय्यरचे देखील नावे
T20 Mumbai League 2025 Icon Players List : पृथ्वी शॉ हा एकेकाळी भारताचा उदयोन्मुख तारा मानला जात होता. त्याच्याबद्दल असे म्हटले जात होते की तो येत्या काळात भारतीय संघाचा एक मोठा फलंदाज होईल आणि संघाचे नेतृत्वही करेल. पण खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे पृथ्वी या शर्यतीतून मागे पडला. इतके मागे पडला की आयपीएल-2025 मध्ये कोणत्याही संघाने त्यावर बोली लावली नाही. पण, आता पृथ्वी आयकॉन खेळाडू बनला आहे.
खरंतर, बहुप्रतीक्षीत टी-20 मुंबई लीग 2025 ची उत्सुकता शीगेला पोहोचलेली असतानाच मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आज आयकॉन खेळाडूंची नावे जाहीर केली, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि अजिंक्य राहाणे यांचा समावेश आहे. टी-20 मुंबई लीग ही भारतातील आघाडीच्या फ्रँचाईझी देशांतर्गत टी-20 स्पर्धांपैकी एक असून ती सहा वर्षानंतर परत येत आहे. याचा तिसरा सीझन मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 26 मे ते 8 जून दरम्यान होणार आहे.
आयकॉनिक खेळाडूंमध्ये सरफराझ खान, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे आणि तुषार देशपांडे यांचाही समावेश आहे. सर्व आठ खेळाडूंनी भारताचे सर्वोच्च पातळीवर प्रतिनिधीत्व केले असून त्यावरून मुंबईच्या क्रिकेट क्षेत्रात असलेली असामान्य गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.
“आपल्या असामान्य कामगिरीद्वारे मुंबईसाठी अभिमानास्पद ठरलेल्या आठ आयकॉन खेळाडूंची नावे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे खेळाडू मुंबई क्रिकेटचा वारसा, वृत्ती आणि गुणवत्तेचे प्रतीक आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे उभरत्या गुणवत्तेला प्रेरणा व मार्गदर्शन मिळेल, शिवाय त्यांच्यासाठी ही शिकण्याची उत्तम संधी ठरेल. आम्ही भारतासाठी नव्या दमाचे खेळाडू शोधून, त्यांना घडवण्यासाठी बांधील आहोत. लीगमध्ये या खेळाडूंच्या असण्याने शान वाढेल आणि चाहत्यांना थरारक व अविस्मरणीय अनुभव मिळेल,” असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले.
प्रत्येक फ्रँचाईझीला एका आयकॉन खेळाडूची त्यांच्या स्क्वॅडमध्ये निवड करण्याची मुभा असते व त्यामुळे त्यांचा अनुभव तसेच स्टार पॉवर वाढते. एमसीए लवकरच लिलावाची तारीख जाहीर करेल. आधीच्या आवृत्तीमध्ये टी-20 मुंबई लीगने उद्योन्मुख खेळाडूंना या क्षेत्रातील नामवंत खेळाडूंसह आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली होती. आगामी सीझनलाही भरभरून प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 2800 खेळाडूंनी नोंदणी केली आहे.
हे ही वाचा –
अधिक पाहा..
Comments are closed.