पुण्यात आणखी एक संतापजनक घटना, 50 वर्षांच्या नराधमाचा बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भोरमधील नसरापुरात 65 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच पुण्यातील पर्वती भागात असेच विकृत कृत्य समोर आले आहे. 50 वर्षीय नराधमाने नऊ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क नागरिकांमुळे ही बालिका नराधमाच्या तावडीतून सुटली. संतप्त लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून पर्वती पोलीस ठाण्याबाहेर रात्री उशिरापर्यंत मोठा जमाव होता.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. लेकीबाळींवर अत्याचाराच्या घटना रोज घडत आहेत. पुण्यातील लागोपाठच्या घटनांनी सगळेच हादरले आहेत.

नेमकं काय घडलं?

पर्वती पायथा येथे ही संतापजनक घटना घडली. 50 वर्षीय नराधमाने अश्लील इशारे करत बालिकेला पकडले. तिचे कपडे फाडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी नराधमाने पळण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी त्याला पकडून चोप दिला.

ही घटना कळताच पर्वती पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी झाली. लोकांच्या भावना तीव्र होत्या. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ, त्याला ठेचून काढू, असे सांगत लोकांनी ठिय्या दिला. रात्री उशिरापर्यंत तिथे तणावाची स्थिती होती. पोलिसांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र लोक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

Comments are closed.