पुणे विमानतळाची धावपट्टी पुन्हा सुरू, हवाई दलाच्या विमानाच्या हार्ड लँडिंगमुळे झाले होते बंद
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाचा अपघात झाला होता. त्यानंतर इथली धावपट्टी बंद करण्याता आली होती. आता शनिवारी सकाळपासून पुन्हा नियमित उड्डाणांसाठी सुरू करण्यात आली. भारतीय हवामान दलाच्या विमानाने लोहगाव हवाई तळावर रात्रीच्या सराव उड्डाणादरम्यान हार्ड लँडिंग केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.
ही घटना शुक्रवारी रात्री सुमारे 10:25 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच नागरी मालमत्तेलाही कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती देण्यात आली.
या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने धावपट्टी तत्काळ बंद करण्यात आली होती. दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणीसाठी सुमारे 9 तास धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. हवाई दलाच्या पथकांनी रात्रभर काम करत शनिवारी सकाळी 8:00 वाजेपर्यंत धावपट्टी पुन्हा कार्यान्वित केली.
दरम्यान, सकाळी 7:30 वाजल्यापासून विमानांची प्रस्थाने (departures) सुरू करण्यात आली, तर 8:00 वाजल्यापासून आगमन (arrivals) सुरू झाले. त्यानंतर हळूहळू हवाई वाहतूक सुरळीत होत गेली.
या घटनेमुळे सर्व येणारी आणि जाणारी व्यावसायिक उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली होती. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, “रात्रीच्या सराव उड्डाणादरम्यान दोन वैमानिक विमानात होते. या घटनेमुळे धावपट्टी स्वच्छ होईपर्यंत सर्व उड्डाणे थांबवावी लागली. ही प्रक्रिया सुमारे 9 तास चालली.” या घटनेनंतर विमानतळावरील सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या असून हवाई वाहतूक आता सुरळीत सुरू आहे.
Comments are closed.