वनराजला मारुन माझा मुलगा हिरावला, आता जावयालाही मुलगा नसल्याचं दु:ख कळण्यासाठी बंडू आंदेकरकडून
पुणे : पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व सहा आरोपींना पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी १३ आरोपींनी खुनाचा कट रचून आयुषला संपविल्याचे न्यायालयात सांगितले आहे. यादरम्यान हत्या कशी केली, कुणाकुणाचा सहभाग होता, याची माहिती देखील पोलिसांनी न्यायालयात दिली आहे.
ऐन गणेशविसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे शहरात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार दिसून आला. आंदेकर-कोमकर टोळी युद्धातून गुन्हेगारीशी कसलाही संबंध नसणाऱ्या १९ वर्षीय आयुषची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. माझ्या मुलाची वनराजची हत्या करून मुलगा नसल्याची वेदना मला दिली, आता तुलाही (जायवाला) मुलगा नसतो त्याचे काय दु:ख असते हे दाखविण्यासाठी बंडू आंदेकरच्या टोळीने आयुषची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. आयुषची आई कल्याणी कोमकरने पोलीस तक्रारीत बंडू आंदेकर आणि त्यांच्या टोळीविरोधात तक्रार दिली आहे. बंडू आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु या ६ आरोपींची नावे आयुषच्या हत्या प्रकरणात समोर आली आहेत.
हत्या कशी केली, कोणाकोणाचा सहभाग होता? रेकी ते मर्डरपर्यंत…
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण १३ जणांनी आयुष कोमकरच्या हत्येचा कट रचलेला होता. त्यापैकी दोघांनी भवानी पेठ मधील पार्किंगमध्ये जात पिस्तूलने फायरिंग करून आयुषचा खून केला. बाकीच्या आरोपींच्या सांगण्यावरून हा खून करण्यात आला. आरोपींकडील पिस्तूल आम्हाला जप्त करायचं आहेत. पिस्तूल आणि गोळ्या कुठून आणल्या याचा तपास करायचा आहे. इतर पाच आरोपी फरार आहेत, त्यांचा पत्ता आणि माहिती याच आरोपींना माहिती आहे. त्यांना शोधायचं आहे. यासंदर्भातील सखोल तपास करायचा असल्याचे सांगून पोलिसांनी आरोपींची पोलीस कोठडी मागितली आहे.
तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपींनी सोमनाथ गायकवाड यांच्या घराची देखील रेकी करण्यात आली होती, असा धक्कादायक दावा पोलिसांनी केला आहे. याच आरोपींवर भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचेही पोलिसांनी यावेळी न्यायालयात सांगितले आहे. आंदेकर टोळीनेच आयुषचा खून केला, असा दावाही पोलिसांनी केला आहे.
आंदेकर टोळीने याआधी आंबेगावमध्ये सोमनाथ गायकवाड याच्या घरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींची ओळख परेड घ्यायची आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. यांच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत. एका एका आरोपीवर ३-३ किंवा २-२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी हत्या केली त्यांचे कपडे जप्त करायचे आहे. हे टोळी युद्ध असून अनेकांनी अनेकांचा कट रचून खून केल्याच्या आतापर्यंतच्या घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आपल्या टोळीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना जिवे ठार करण्याचा कट नियोजन यापूर्वीच केल्याचे निष्पन्न होत आहे. या गुन्ह्यात वापरलेले पिस्टल व त्यामधील राऊंड कोठून आणले आहे, त्यांना कोणी पुरविले आहे, याबाबत आरोपीकडे तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. फरार आरोपींचा ठाव ठिकाणाबाबत अटक आरोपीकडे तपास करून त्यांना अटक करायची आहे, असे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने अधिक तपासासाठी आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. आरोपी बंडू आंदेकर याने कोर्टात मला या गुन्ह्यात गोवल्याचे सांगितले आहे.
दाखल गुन्ह्यात कलमवाढ
अमन पठाण व यश पाटील यांनी भवानी पेठ येथील एका पार्किंगमध्ये पिस्टलने फायरिंग करुन खून करून ‘इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असं म्हणत याठिकाणी दहशत माजवली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दाखल गुन्ह्यात क्रिमिनल लॉ अमेडमेंड कलम ७ प्रमाणे कलमवाढ करण्यात आल्याचे तपास अधिकारी यांनी न्यायालयात सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.