कोरेगाव पार्क हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला दणका, जामिनासाठी एकामागे एक 8 अर्ज, कोर्टाने घेतला

पुणे कार अपघात: कोरेगाव पार्क–मुंढवा रस्त्यावर घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील (Koregaon Park Mundhwa Road Hit and Run Case) आरोपीने एकामागून एक तब्बल आठ वेळा जामिनासाठी अर्ज करून न्यायालयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुणे सत्र न्यायालयाने आरोपी आयुष प्रदीप तायाल याचा जामीन अर्ज फेटाळून कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी त्याच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी दिला. आदेशात त्यांनी नमूद केलं की, आरोपीने स्वच्छ हेतूने न्यायालयात येण्याऐवजी खोटेपणा, दिशाभूल आणि माहिती लपविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आणि सरकारी यंत्रणेवर अनावश्यक आर्थिक ताण पडला. त्यामुळे न्यायालयाने हे प्रकरण गंभीरपणे घेत आरोपीला दंडात्मक कारवाईद्वारे धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

डिलिव्हरी बॉयला चिरडलं

आयुष तायाल (34, रा. मगरपट्टा सिटी) याने 11 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास दारूच्या नशेत भरधाव ‘ऑडी’ कार चालवत रौफ शेख (21) या डिलिव्हरी बॉयला चिरडले होते. या घटनेत रौफचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, आरोपीविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं आहे.

आठव्यांदा जामीन अर्ज फेटाळला, 1 लाखांचा दंड

या गुन्ह्यात आरोपी आयुष तायाल याने आठव्यांदा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सरकारी वकील जावेद खान यांनी याला तीव्र विरोध केला. आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, तसेच पुराव्यांशी छेडछाड करू शकतो, अशी भीती तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी त्याच्यावर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

15 दिवसांच्या आत दंड जमा करण्याचे आदेश

न्यायाधीश चव्हाण यांनी आदेशात स्पष्ट केलं की, “चांगले पीक घेण्यासाठी चांगल्या बियाण्यांची गरज असते; मात्र बियाणेच खराब असेल, तर पीक अपेक्षित कसे राहील? पक्षकाराचे वर्तन जर अयोग्य असेल, तर अशा प्रकरणांची हाताळणी अधिक सावधगिरीने करावी लागते,” असे त्यांनी म्हटले आहे. न्यायालयाने आयुष तायाल याला 15 दिवसांच्या आत हा दंड रक्कम पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

Pune Crime News: कोथरुड पोलिसांकडून छळ, दाद मागूनही तक्रार घेईनात, पुण्यातील तरुणी आता थेट हायकोर्टात जाणार

आणखी वाचा

Comments are closed.