पोलिसांना वाटलं पुन्हा गँगवॉर होणार नाही, पण बंडू आंदेकरने सगळ्यांचाच अंदाज चुकवला, नेमकं काय घ

गुन्हे बंडू अंदेकर घाला: पुण्यात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आंदेकर टोळीच्या मारेकऱ्यांनी आयुष कोमकर (वय 19) याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. गेल्यावर्षी पुण्यात आंदेकर कुटुंबातील मालमत्तेच्या वादातून वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली होती. या हत्याप्रकरणात वनराज आंदेकर (Vanraj Andekar Murder) याच्या बहिणी आणि त्यांच्या सासरच्या मंडळींचा समावेश होता. वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला आंदेकर टोळीने आयुष कोमकर (Ayush Komkar Murder) याला मारुन पूर्ण केला. या सगळ्या प्रकरणात पोलिसांचा (Pune Police) आंदेकर टोळीविषयीचा अंदाज चुकला आणि त्याची परिणती आयुष कोमकरच्या हत्येत झाली. पुणे पोलिसांनी आपला अंदाज चुकल्याची कबुलीही स्पष्टपणे दिली.

पुण्यातील आंदेकर कुटुंबाचा इतिहास हा रक्तरंजित राहिलेला आहे. आतापर्यंत टोळीयुद्धात आंदेकर कुटुंबातील सहा सदस्य मारले गेले आहेत. आंदेकर कुटुंबावर पूर्वीपासून पुण्यातील अनेक राजकारण्यांचा वरदहस्त राहिला आहे. 2024 साली बंडू आंदेकर याने सामोपचाराची भाषा करत टोळीयुद्धाला विराम देण्याचा मानस व्यक्त केला होता. इथून पुढे काही करणार नाही, वाद मिटवून घ्यावेत, असे त्याने म्हटले होते. मात्र, आंदेकर कुटुंबातील मालमत्तेचा वाद नंतरच्या काळात प्रचंड चिघळला. आपल्याला प्रॉपर्टीतील हिस्सा मिळावा, यासाठी बंडू आंदेकर यांच्या मुली आणि जावई आक्रमक झाले होते. वनराज आणि कृष्णराज  आंदेकर यांनी आपल्याला मालमत्तेतील वाटा द्यावा, अशी मागणी ते सातत्याने करत होते. मात्र, हा वाटा न दिल्यामुळे गेल्यावर्षी वनराज आंदेकर याची कोयत्याने वार करुन आणि गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यामध्ये वनराज आंदेकर याच्या बहिणी आणि त्यांचे नवरे सामील होते. यानंतर पोलिसांनी संपूर्ण कोमकर कुटुंब आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकले. कोमकर कुटुंबातील गणेश कोमकर, त्याचा भाऊ आणि त्याची बायको तुरुंगात गेल्यावर प्रॉपर्टीचा हा वाद आणि पर्यायाने टोळीयुद्ध आपोआप थांबेल, असा पोलिसांचा अंदाज होता.

पोलिसांनाही आता आंदेकर टोळी मारण्यासाठी कोणीही बाहेर नसल्याने काही करणार नाही, असे वाटले होते. मात्र, गेली अनेक वर्षे गुन्हेगारीत मुरलेल्या बंडू आंदेकरने इथेच सगळ्यांचा अंदाज चुकवत कोणीही कल्पना केली नव्हती, अशी कृती केली. बंडू आंदेकरने आपल्याच 19 वर्षांच्या नातवाला ठार मारुन ‘खून का बदला खून’, असा संदेश दिला. हा वाद फक्त मालमत्तेचा नव्हता तर माझ्या मुलाला (वनराज आंदेकर) मारले आता पुढचा नंबर तुझ्या मुलाचा, असा न्याय बंडू आंदेकर याने लावला. आंदेकर गँगच्या शुटर्सनी 9 गोळ्या घालून आयुष कोमकरच्या शरीराची चाळण केल्यानंतर “इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर”, असे ओरडत होते. यावरुन बंडू आंदेकरला पुण्यात फक्त आमचीच दहशत आणि वर्चस्व राहणार, असा संदेश द्यायचा होता. या वादाचा बळी ठरलेला आयुष कोमकर हा अवघ्या 19 वर्षांचा होता. त्याच्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नव्हती. त्यामुळे गुन्हेगारी विश्वात नसलेल्या आपल्या नातवाला बंडू आंदेकर संपवेल, असे पोलिसांना वाटत नव्हते. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासगीत ही बाब मान्य केली.

https://www.youtube.com/watch?v=oikfgsggqn4

आणखी वाचा

ए गोविंदा… झोपलाय तो, पप्पा आलेत, उठायला सांग त्याला; गणेश कोमकर लेकाचा मृतदेह पाहताच धाय मोकलून रडला

आणखी वाचा

Comments are closed.