गणेश काळे प्रकरणातील आरोपींची ‘ससून’मध्येच कृष्णा आंदेकरशी भेट, रुग्णालयातच सुपारी फिक्स? पुणे
पुणे क्राईम गणेश काळे: आंदेकर आणि कोमकर या टोळी युद्धात गणेश काळेची (Ganesh Kale) हत्या झाली आणि या हत्येला पुणे पोलिसांचा (Pune Police) हलगर्जीपणा भोवला का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. गणेश काळेच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर (Bandu Andekar) याचा मुलगा आणि गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या आयुष कोमकर (Ayush Komkar) हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकरची (Krushna Andekar) भेट घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या भेटीतच गणेश काळेच्या हत्येचा आदेश देण्यात आला होता का? ससून रुग्णालयात (Sassoon Hospital Pune) त्याच्या हत्येची सुपारी फिक्स झाली होती का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Pune Crime Ganesh Kale)
गणेश काळेच्या हत्येच्या काही दिवसापूर्वी कृष्णा आंदेकरला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे. त्या वैद्यकीय तपासणी दरम्यान गणेश काळेच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी थेट ससूनमध्ये जाऊन कृष्णा आंदेकरची भेट घेतल्याची माहिती आहे आणि याच भेटीची सध्या पुण्यात चर्चा आहे. सोबतच बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आणि नातू स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरून अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने गणेश काळेवर नऊ गोळ्या झाडून कोयत्याने वार करून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय.
Pune Crime Ganesh Kale: आरोपी कृष्णा आंदेकरला कसा भेटला?
कोणत्याही आरोपीची प्रकृती बिघडली असेल तर कारागृहातून त्या आरोपीला पुणे पोलीस ससून रुग्णालयात घेऊन येतात. त्या आरोपीवर नजर ठेवायची जबाबदारी त्यांची असते. त्यांची तपासणी होईपर्यंत पोलिसांना तिथेच थांबावं लागतं आणि तपासणीनंतर त्या आरोपीला थेट कारागृहात घेऊन जाऊन तिथे नोंद करावी लागते. त्यामुळे हा आरोपी कृष्णा आंदेकरला कसा भेटला असेल? असाही प्रश्न आहे.
Pune Crime Ganesh Kale: आतापर्यंत ‘या’ आरोपींना अटक
गणेश काळे मृत्यू प्रकरणात अमन मेहबूब शेख, अरबाज अहमद पटेल , मयूर दिगंबर वाघमारे अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, कृष्णा ऊर्फ कृष्णराज राणोजी आंदेकर, स्वराज नीलंजय वाडेकर, आमीर खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय.
Ganesh Kale Murder Case: नेमकं काय प्रकरण?
शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास पुण्यातील वर्दळीच्या भागात एका 32 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोपदेव घाट रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोलपंपासमोर ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव गणेश काळे असून तो रिक्षाचालक होता. गणेश हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळेचा सख्खा भाऊ आहे. वनराज आंदेकरच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप समीर काळेवर आहे.
पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेश काळे रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने जात असताना, दोन दुचाकींवरून आलेल्या चार जणांनी त्याचा पाठलाग केला. पेट्रोलपंपाजवळ रिक्षा अडवून या हल्लेखोरांनी गणेशवर जवळून गोळीबार केला. एकूण चार राऊंड फायर करण्यात आले. गोळीबारात गणेशच्या मानेत, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्या. तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळताच, दोन हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने दोन वार केले. त्यामुळे त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. गणेश काळे हा येवलेवाडीत राहत होता. घटनेच्या वेळी तो खडी मशीन चौकाच्या दिशेने जात होता. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्याला स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येप्रमाणेच यामध्येही तसाच ‘पॅटर्न’ वापरण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.