पुण्यातील गंभीर गुन्ह्यामुळे पासपोर्ट मिळण्यामध्ये अडचण; निलेश घायवळने लढवली शक्कल, या ठिकाणचा
पुणे : कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबार (Kothrud Firing Case) प्रकरणात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) आणि त्याच्या टोळीतील दहा जणांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मकोका अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे हा गोळीबार पोलीस ठाण्यापासून अवघ्या शंभर ते दोनशे मीटर अंतरावर झाला होता. या तपासादरम्यान मुख्य आरोपी निलेश घायवळ घटना घडल्यानंतर लंडनला पळून गेल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कोथरूडमधील घरावर छापा टाकून दोन स्कॉर्पिओ कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.(Pune Crime News)
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला फरार कसा झाला याबाबतची माहिती समोर आली आहे. निलेश घायवळ लंडनला गेला कसा असा सवाल उपस्थित केला जात होता. यातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. लंडनला पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील पत्ता दिल्याचं समोर आलं आहे. पुण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने पासपोर्ट मिळण्यामध्ये अडचण येऊ शकते हे ओळखून घायवळने नगरमधील बनावट पत्त्याचा पासपोर्ट मिळवण्यासाठी उपयोग केला आहे. नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळला कोणाचा वरदहस्त लाभलाय हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
नगरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड हा पत्ता घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी वापरल्याचं उघड झालं. त्यामुळे नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निलेश घायवळचा गुन्हेगारी इतिहास न तपासताच पासपोर्टसाठी संमती कशी दिली हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे नगर पोलीस आता वादात सापडू शकतात. नगरमधून पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळला कोणाचा वरदहस्त लाभला हा प्रश्नदेखील यामुळे उपस्थित होत आहे.
Nilesh Ghaywal London Escape: पासपोर्ट पोलिसांकडे जमाच केला नाही
निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याचं पोलिस तपासातून समोर आलं, कोर्टाच्या सुचनेनुसार त्याने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही, असं पोलिसांनी म्हटलं. तसेच, त्याच्याबाबत लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केलं. निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यामधुन खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातूनच त्याने लंडनमध्ये घर घेतलं आहे. निलेशचा मुलगाही लंडनमध्ये हायफाय ठिकाणी शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळेच, पोलिसांनी आता त्याच्या कोथरुड येथील घरातून कारवाईला सुरुवात केली आहे. लंडनला पळून गेलेल्या गुंड निलेश घायवळच्या पुण्यातील कोथरुड भागातील घराची पुणे पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास झाडाझडती घेतली. यावेळी घायवळच्या दोन स्कोर्पिओ आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे, लंडनमध्ये पळून जाऊन ऐशोआरामात जगणाऱ्या निलेश घायवळला पुणे पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
Nilesh Ghaywal London Escape: 2 स्कॉर्पिओ कार आणि 2 दुचाकी जप्त केल्या
निलेश घायवळविरोधातील कारवाईचा भाग म्हणून पुणे पोलिसांनी आज त्याच्या घरी धाड टाकत दोन स्कॉर्पिओ कार आणि दोन दुचाकी जप्त केल्या. याचबरोबर, कोथरूडमधील हल्ल्यात सामील असलेल्या इतर सात आरोपींच्या घरांचीही पोलिसांनी झडती घेतली. दरम्यान, 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री कोथरूड परिसरातील नागरिकांवर झालेल्या हल्ल्यातील सात आरोपींना पोलिसांनी कोथरूड भागातून तोंडावर काळे कापड बांधून धिंड काढली. सायंकाळच्या सुमारास झालेल्या या धिंडीमुळे कोथरूडसह पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली. विशेष म्हणजे, आज सकाळीच हडपसर पोलिसांनी काही गुंड-दरोडेखोरांना गुडघ्यावर रांगवत धिंड काढली होती.
आणखी वाचा
Comments are closed.