आंदेकर – कोमकर टोळीयुद्धाचा समान पॅटर्न, मिसरुडही न फुटलेली पोरं शार्प शुटर्स, फक्त भाई व्हायचा
पुणे: पुण्यातील आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात अल्पवयीन आणि नुकतीच वयाची आठरा वर्षे पार केलेल्या युवकांचा उपयोग करून घेण्यात आल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी आयुष कोमकरवर गोळ्या झाडणारे यश पाटील आणि अमित पाटोळे हे दोघेही १९ वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे या दोघांचा ऑकटोबर २०२३ मध्ये झालेल्या निखिल आखाडेच्या हत्येमध्ये देखील सहभाग होता. मात्र त्यावेळी अल्पवयीन असल्याने त्यांना अटक होऊ शकली नव्हती. वनराज आंदेकारच्या हत्येमध्येही अल्पवयीन आरोपीचा सहभाग होता यामुळं “भाई” बनण्याच्या आकर्षणापोटी युवक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
क्रूरता सराईत गुन्हेगाराला देखील लाजवणारी
तीन ऑकटोबर २०२३ ला पुण्यातील गणेश पेठेत झालेली निखिल आखाडेची हत्या, एक सप्टेंबर २०२४ ला नाना पेठेत झालेली वनराज आंदेकरची हत्या आणि पाच सप्टेंबरला झालेली आयुष कोमकरची हत्या, आंदेकर – कोमकर टोळीयुद्धातून झालेल्या या तीन हत्यांमध्ये एक सामान सूत्र आहे. ते म्हणजे या हत्यांसाठी करण्यात आलेला कोवळ्या वयातील युवकांचा वापर. या हत्या प्रकरणांमधील अनेक आरोपी तर अल्पवयीन आहेत. मात्र हत्या करताना त्यांनी दाखवलेली क्रूरता सराईत गुन्हेगाराला देखील लाजवणारी आहे.
लोखंडी गज आणि स्क्रू ड्रायव्हरने वार करून साहिलची निर्घृण हत्या
आंदेकर -कोमकर टोळीतील हिंसक संघर्षला सुरुवात झाली ऑकटोबर २०२३ मध्ये, पुण्यातील गणेश पेठेत आंदेकर टोळीकडून कोमकर टोळीतील निखिल आखाडेची हत्या करण्यात आली. हातोडा, लोखंडी गज आणि स्क्रू ड्रायव्हरने वार करून साहिलची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या हत्येतील आरोपींमध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांचा समावेश होता. मात्र दोघेही त्यावेळी १७ वर्षांचे म्हणजे अल्पवयीन असल्याने त्यांना अटक झाली नाही. त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आणि थोड्याच दिवसांत ते पुन्हा बाहेर आले.
साहिल आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी १ सप्टेंबर २०२४ ला वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली. वनराजवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले. हल्लेखोरांपैकी
* तात्यासाहेब गायकवाड हा १८
* साहिल सुरवसे १९
* साहिल दळवी १९
* संगम वाघमारे २०
* ओम देशखैर 20
* साहिल केंदळे २०
* आकाश म्हस्के २४ वर्षांचे होते .
१९ वर्षांच्या यशने आयुषवर गोळ्या झाडल्या, तर १९ वर्षांचा अमित
वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची पाच सप्टेंबर २०२५ ला नाना पेठेत हत्या करण्यात आली. आयुष कोमकरवर चौघांनी हल्ला केला. ज्यापैकी १९ वर्षांच्या यश पाटीलने आयुषवर गोळ्या झाडल्या, तर १९ वर्षांचा अमित पाटोळे पळण्यासाठी दुचाकी घेऊन तयार होता. हे तेच दोघे आहेत ज्यांनी ऑक्टोंबर २०२३ मध्ये साहिल आखाडेची निर्घृण हत्या केली होती, मात्र अल्पवयीन असल्याच्या सबबीखाली त्यांच्यावर कारवाई झाली नव्हती. पोलिसांनी आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर याच्यासह आठ जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे यांचा समावेश आहे.
भाई बनावं या आकर्षणापोटी तरुण गुन्हेगारी विश्वात
फक्त अशा टोळीयुद्धामध्येच नाही तर इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये देखील अल्पवयीन मुलांचा आणि ज्यांनी नुकताच तारुण्यात प्रवेश केला, अशा तरुणांचा सहभाग वाढताना दिसून येतोय. अनेक घटनांमध्ये सर्वसामान्य नागरिक त्यांच्या हल्ल्यात बळी पडलेत. टोळी प्रमुखांचे सोशल मीडियावरील रिल्स आणि व्हिडीओजच्या पाहून आपणही त्यांच्यासारखे भाई बनावं, या आकर्षणापोटी हे तरुण गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवतायत. त्यांच्यातील भाई बनण्याच्या हव्यास फक्त टोळीयुद्ध यापुरता मर्यादित राहत नाहीये तर समाजासाठी तो धोकादायक बनतोय.
पुणे महापालिकेच्या अनेक शाळा गेल्या काही वर्षांमध्ये बंद पडत गेल्यात. ज्या सुरु आहेत त्या अपुऱ्या शिक्षकांअभावी सुरु आहेत. त्यातून शाळेतून बाहेर पडणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढत गेलंय. दुसरीकडे तथाकथित भाईंच्या व्हर्चुअल इमेजला, रिल्स आणि व्हिडीओंना भुलून ही मुलं गुन्हेगारीकडे आकुष्ट होतायत. ज्यामुळं पुणं राहण्यासाठी दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललंय. त्यामुळं ही फक्त पोलिसांची जबाबदारी उरलेली नसून हा सामाजिक प्रश्न बनला आहे.
https://www.youtube.com/watch?v=6hz5q7u5Miu
आणखी वाचा
Comments are closed.