जिवंत राहायचं नाही का? गुंड निलेश घायवळने महिला व्यावसायिकेलाही दिला त्रास, शिक्षक भावानेही दिल
पुणे : कर्वेनगर आणि शिवणे भागातील नामांकित शाळांना खाद्यपदार्थ व वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या संचालक महिलेला धमकावून पुण्यातील गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal), त्याचा भाऊ सचिन घायवळ (Sachin Ghaywal) आणि त्यांच्या साथीदारांनी तब्बल ४४ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकूण १३ जणांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात एका शाळेतील क्रीडा शिक्षकाचाही समावेश आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) सध्या कोथरूड गोळीबार प्रकरणातही फरार असून, त्याच्याविरुद्ध आतापर्यंत अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली.
Nilesh Ghaywal: धमकावून खंडणी उकळली
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार ४० वर्षीय महिला उद्योजिका त्यांच्या कंपनीमार्फत कर्वेनगर आणि शिवणे भागातील विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ आणि वाहतूक सुविधा पुरवत होत्या. शाळांमध्ये नियमित भेटीमुळे तिची कर्मचाऱ्यांशी ओळख झाली होती. याच दरम्यान, कर्वेनगरमधील एका शाळेत कार्यरत क्रीडा शिक्षक बापू कदम याच्याशी तिची ओळख झाली. २०२४ साली कदमने महिलेची भेट घेत, “माझी कोथरूडमध्ये डेअरी आहे. शाळेतील उपाहारगृहासाठी माझ्याकडून दूध आणि पनीर खरेदी करा,” असा प्रस्ताव दिला. विश्वास ठेवून महिलेनं वेळोवेळी २२ लाख २ हजार रुपये कदमच्या खात्यात जमा केले. मात्र, कदमने दूध किंवा पनीर पुरवठा केला नाही. बाहेरून माल खरेदी करून काम सुरू ठेवावे लागल्याने महिलेनं त्याच्याकडे विचारणा केली.
जानेवारी २०२५ मध्ये झालेल्या भेटीत कदमने कबूल केले की, तो निलेश घायवळ टोळीसाठी काम करतो, आणि घायवळचा भाऊ सचिन हाच शाळेचा क्रीडा शिक्षक आहे. “आमच्याकडूनच खरेदी करावी लागेल, नाहीतर तुमचा व्यवसाय बंद करू,” अशी उघड धमकी कदमने दिली. यानंतर महिला मोटारीतून निघत असताना, कदमने तिची गाडी अडवली. दुसऱ्या वाहनातून निलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि इतर साथीदार उतरले. सचिन घायवळने महिलेवर दबाव टाकत “तुम्हाला जिवंत राहायचं नसेल तर पैसे जमा करू नका,” अशी धमकी दिली. भीतीपोटी महिलेनं पुन्हा २२ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले.
Nilesh Ghaywal: संशय आणि तक्रार
महिलेनं भागीदारांशी चर्चा करून चौकशी केली असता, कदमच्या नावाने सांगितलेली कोणतीही डेअरी कोथरूडमध्ये अस्तित्वात नसल्याचे उघड झाले. त्यानंतर महिलेने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी निलेश घायवळ, सचिन घायवळ, बापू कदम, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर आणि बबलू सुरवसे या सर्वांविरुद्ध खंडणी आणि धमकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, फरार आरोपींना अटक करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे निलेश घायवळ टोळीच्या गुन्हेगारी कारवाया पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.