आंदेकर-कोमकर टोळीत गृहयुद्ध, मामाच्या हत्येचा बदला भाच्याच्या हत्येनं, पुणे हादरलं
पुणे क्राइम पुणे: गणेश विसर्जनाच्यापूर्वसंध्येला पुणे हादरलं आहे. पुण्यातील नाना पेठेत गोविंदा कोमकर (Govinda Komkar) याच्यावर गोळीबार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. आंदेकर टोळीकडून वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याच्या हत्येचा बदला एका वर्षात गोविंदा कोमकर याच्या हत्या करत घेण्यात आल्याचा संशय आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 ला पुण्यात वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. त्याच्या हत्येचा बदला आंदेकर टोळीनं घेतल्याचं म्हटलं जातंय.
मागील वर्षी ज्याची हत्या झाली तो वनराज आंदेकर आणि आज ज्याची हत्या झाली तो गोविंदा कोमकर हे सख्खे मामा – भाचे आहेत. वनराजच्या हत्या प्रकरणात आज ज्याची हत्या झाली त्या गोविंदाचे वडील गणेश , काका जयंत आणि काकू संजीवनी हे तुरूंगात आहेत. गोविंदा हा संजीवनी कोमकरचा पुतण्या, गणेश कोमकरचा मुलगा आहे.
गोंविदा कोमकर याची हत्या पुण्यातील नाना पेठेत घडली आहे. विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला ही हत्या झाल्यानं पुण्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. बरोबर एक वर्षापूर्वी 1 सप्टेंबर 2024 ला वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक होता. गोंविदा कोमकर याच्या या हत्येमुळं आंदेकर टोळीकडून बदला घेण्याचा प्रयत्न केला गेल्याचं म्हटलं जातंय.
काहीच दिवसांपूर्वी आंदेकर टोळीकडून वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या नातेवाईंकावर पाळत ठेवली जात असल्याचं समोर आलं होतं, पोलिसांनी कारवाई केल्याचं सांगितलं होतं तरी देखील आज गोविंदा कोमकरची हत्या घडली आहे.
गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोविंदा कोमकर याचे मारेकरी फरार झाले आहेत. पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकल्याचं समोर आलंय.
पुण्यातील नाना पेठेत हे हत्याकांड झालं आहे. वनराज आंदेकर याची हत्या गेल्या वर्षी जिथं झालेली होती त्यापासून जवळच ही हत्या झालीय. आंदेकर आणि कोमकर यांच्यातील गृहकलह उफाळून आला आहे. मामा हत्येचा बदला, भाच्याची हत्या करुन घेतला गेला आहे.
भाजपचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी या संदर्भात पोलीस प्रशासन योग्य कारवाई करेल. या कुठल्याही गोष्टीचा विसर्जन मिरवणुकीवर परिणाम होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, असं म्हटलं आहे.
दरम्यान, नाना पेठेत पुणे पोलीस दाखल झाले आहेत. या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.