‘टपका रे टपका, एक ओर टपका’, संकेत की योगायोग? डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं? टोळीयुध्द पुन्ह
पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा टोळीयुद्धाची घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच ठिकाणी माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची हत्या झाली होती. त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच त्यांच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर (Ayush Komkar) असे मृत तरुणाचे नाव असून, या हत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना, त्याच्या घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या. गंभीर जखमी झालेल्या आयुषला ससून रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या हत्याकांडाबद्दल पोलिस तपास करत आहेत.
डीजेवर गाणं अन्…
आयुष कोमकरची हत्या झाली त्यावेळी डीजेवर लावलेल्या गाण्याची चर्चा होताना दिसत आहे. ज्यावेळी हत्या करण्यात आली, तेव्हा बाजुच्या एका गणेश मंडळाच्या डीजेवर ‘टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं लावण्यात आलं होतं. हे गाणं सुरू असतानाच हा खून झाल्याने या दोन्ही घटनांना एकमेकांशी जोडलं जात आहे. डीजेवर गाणं लावून आधी संकेत दिले, त्यानंतर ही हत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया, दो ये मटका हे गाणे डीजेवर लावत नाना पेठेत गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचे वृत्त नवराष्ट्र या वृत्तसंस्थेने दिले आहे.
‘टपका रे टपका, एक पहिला टपका, चार में से एक गया, तीन का ये मटका’, असे या गाण्याचे बोल आहेत. याबाबतची कसलीही पुष्टी पोलिसांनी केली नाही. मात्र याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर असं टोळीयुद्ध पुन्हा भडकू शकतं. आयुषचे वडील गणेश कोमकर हा वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. सध्या तो तुरुंगात आहेत. आयुष कोमकर हा वनराज आंदेकर यांचा भाचा देखील होता. त्यामुळे, ही हत्या जुन्या वैमनस्यातून आणि ‘खून का बदला खून’ या सूड भावनेतून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. पुणे गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, गुन्हेगारांना इशारा देताना, “चुकीला माफी नाही” असे म्हणत, कोणताही गुन्हा करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा, असा संदेश दिला आहे. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल आणि दोषींना सोडले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय घडलं?
वर्षभरापूर्वी 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून करण्यात आला होता. त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून केला जात होता, अशी माहिती तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी मिळाली होती. टोळीने आंबेगाव पठार भागात रेकी केली होती, त्याबाबत पोलिसांनी कारवाई देखील केली होती; मात्र, हल्ला थेट नाना पेठेच्या मध्यवर्ती भागात घडवून आणला. गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्लासवरून येऊन गोविंद हा त्याच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये थांबला असताना त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी तीन गोळ्या झाडल्या. गोविंद याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या खुनामुळे पुणे शहरात परत एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=2nf6xdz-iky
आणखी वाचा
Comments are closed.