विद्येचं माहेरघर पुन्हा हादरलं! पुण्यात तरुणीवर अत्याचार, ओळखीचा गैरफायदा, सोशल मीडियातून धमक्य

पुणे: पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये घडलेली 26 वर्षीय तरूणीवरील बलात्काराची घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेनं पुणे हादरलं आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली. ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. इतकच नव्हे तर तिला सोशल मीडियातून वारंवार धमकी दिली जात असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र वीस दिवसानंतरही त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही अशी माहिती आहे. पीडित तरुणीला आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी देत आहे. तसेच तिच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील फोटो सुद्धा आरोपीकडून पाठवण्यात आले आहेत. यावर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. तर या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, अशा घटना वारंवार घडत असल्याने महिला, तरूणी यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी काय दिली माहिती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. 26 फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तो गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यावर त्याचा पुढील तपास सुरू केलेला आहे. आरोपीचा फोन बंद असल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचा तांत्रिक तपास करून आम्ही आरोपी पर्यंत पोहोचू आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करू असं पोलिसांनी सांगितलं आहे.

तांत्रिक तपासणीमध्ये काही अडचणी आल्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचता आलेलं नाही. आम्हाला आणखी काही दुवे मिळाले आहेत. त्या आधारे आम्ही त्याला लवकरात लवकर अटक करू. तो तरुणीला धमक्या देत आहे, त्यानुसार कलमांमध्ये वाढ केलेली आहे आणि त्यामध्ये कारवाई देखील केली जाईल. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा फोन बंद असल्यामुळे त्याला शोधण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत, बाकी तांत्रिक तपास सुरू आहे त्यामुळे आम्ही निश्चितच लवकरच आरोपी पर्यंत पोहोचू, असं भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.