पुण्यात पुन्हा गुडांराज? दहशत पसरवणं, वाहनांची तोडफोड सुरूच, 35 टक्के आरोपी हे अल्पवयीन, पोलिसा
पुणे: एकीकडे पुणे पोलीस आयुक्त भयमुक्त गणेशोत्सव करण्याची ग्वाही देत आहेत, मात्र याच पुण्यात मागील महिन्याभरात 8,9 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. महिन्याभराची आकडेवारी, वर्षभरातल्या घटना आणि महत्वाचं म्हणजे यात समाविष्ठ असलेले अल्पवयीन मुलांची टक्केवारी पाहता पुण्यातली गुन्हेगारी सध्या गंभीर वळण घेताना दिसत आहे. वाहन तोडफोडीच्या नवा पॅटर्नने पोलिसांसमोर आव्हान असताना पुणे पोलीस यावर योग्य कारवाई करताना किंवा या घटना थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करताना फेल ठरत असल्याचं बोललं जात आहे.
पुण्यातल्या एकाच भागातून नाही तर विविध परिसरातून या घटना समोर आल्याने पुणेकरांची मात्र रात्रीची झोप उडाल्याचा पाहायला मिळत आहे. रात्रीच पोलिसिंग होत नाही आणि सोबतच दहशत निर्माण करणाऱ्यांची अरेरावी सहन करावी लागते अशा प्रतिक्रिया पुणेकर देतायेत. मागील काही दिवसांच्या गुन्हेगारीची आकडेवारी बघितली तर या सगळ्या वाहन तोडफोडीत अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचा समोर आलाय आणि यांची टक्केवारी बघितली तर 35 टक्के अल्पवयीन मुलं कोयता गॅंग, वाहन तोडफोडी आणि सोबतच दहशत पसरवणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये दिसून येत आहेत. या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण पोलिसांसमोर येत्या काळात मोठ आव्हान असणार आहे. त्यामुळे भयमुक्त गणेशोत्सव होइलच मात्र भयमुक्त पुणे कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
35 टक्के आरोपी हे अल्पवयीन
आता पुण्यातल्या तोडफोडीच्या आकडेवारीवरुन हे प्रकरण किती गंभीर आहे. हे समजून घेऊ. मागील दीड वर्षात 124 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात सगळ्यात गंभीर बाब म्हणजे 35 टक्के आरोपी हे अल्पवयीन असल्याचं आकडेवारी सांगते. पुण्यात गुन्हेगारी थांबवायची असेल तर त्यावर रोज नव्या उपाययोजना करणं किंवा गुन्हेगारांना कडक शिक्षा करणं गरजेचं दिसत आहे. खून, खूनाचे प्रयत्न, वाहन चोरी, पिस्तूलांची खरेदी विक्री, पिस्तूल बाळगणे तसेच वाहन तोडफोड, दहशत माजविणे अशा गुन्ह्यांत अल्पवयीन मुलं सहभागी आहेत आणि येणारी पीढी गुन्हेगारीच्या विळण्यात दिसत आहे.
वाहन तोडफोडीचे हॉटस्पॉट कोणते?
पुण्यात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेच मात्र त्यांना सोडलं तर अनेक लहान मोठे गुन्हेगारदेखील सक्रिय असल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. त्यातच पुण्यातील वाहन तोडफोडच्या घटनांचे काही हॉटस्पॉटदेखील आहेत. याच परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत माजवणे, वाहनांची तोडफोड करणे, नागरिकांना त्रास देणं हे सगळे प्रकार दिसत आहेत. कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी या तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत सलग तीन दिवस वाहन तोडफोडचे प्रकार घडले. एका पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
दीड वर्षात 124 घटनांची नोंद
शहरात वाहन तोडफोडीच्या दीड वर्षात तब्बल 124 घटना घडल्या असून, त्यामध्ये गेल्या वर्षी (2024) 89 घटना घडलेल्या आहेत. त्यातील 81 गुन्हे उघड असून, 255 आरोपी आहेत. तर अल्पवयीन 87 मुलांचा सहभाग होता. तर चालू वर्षात 35 घटनांत 82 आरोपीपैकी 50 मुले अल्पवयीन आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.