‘साप आला म्हणून आधीच धक्का दिला होता…’ केतनच्या वडिलांचा सियाच्या कुटुंबावर संशय
पुणे : पुण्याच्या प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून (Lohagad Fort) होणारा पती केतन अग्रवाल (Ketan Agrawal) याला दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणंने आता अधिक गंभीर स्वरूप धारण केलं आहे. केतनची हत्या केवळ त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच केली की यामध्ये सियाच्या कुटुंबाचाही हात होता? असा संशय आता व्यक्त केला जात आहे. मृत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांसमोर येत अत्यंत भावूक आणि खळबळजनक वक्तव्य केलं. या हत्येच्या कटात सियाच्या कुटुंबीयांचाही सहभाग होता का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
Lohagad Fort Case Pune : ‘साप आला… साप आला…’ म्हणून आधीच रचला होता कट
केतनच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी घडलेल्या या अंतिम घटनेपूर्वीही सियाने केतनचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, जो आता समोर आला आहे. विशाल अग्रवाल म्हणाले की, 14 जून रोजी जेव्हा ते दोघे लोहगडावर गेले होते, तेव्हा तिथे ‘साप आला, साप आला’ असं ओरडत सियाने केतनला धक्का देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने तो प्रयत्न फसला. तो प्रकार घडल्यानंतर तिने केतनला मिठी मारली. त्यावेळी तिथे कोणताही साप नव्हता, तर तो त्याला दरीत ढकलण्याचा पहिला प्रयत्न होता, हे आता आमच्या लक्षात येत आहे. तिची विकृती तेव्हाच समोर आली असती तर आज माझा मुलगा वाचला असता.”
Siya Goyal Lohagad Case : तिच्या घरच्यांचेही प्लॅनिंग होतं का?
विशाल अग्रवाल यांनी या गुन्ह्यात मुलीच्या कुटुंबीयांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, “साखरपुडा झाला होता, पण जर लग्न मनाविरोधात चालले होते, तर स्पष्ट नाही म्हणायला काय हरकत होती? खून करायची काय गरज होती? सियाचे बाहेर प्रेम होते, माझ्या मुलावर नव्हते, तरीही तिने आमच्या संपूर्ण कुटुंबाचा, आमच्या पैशांचा आणि आनंदाचा उपभोग का घेतला? या संपूर्ण कटात तिच्या घरच्या लोकांचंही काही प्लॅनिंग होतं का? याची पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे. या प्रकरणाच्या मूळाशी जाऊन प्रत्येक धागादोरा शोधला जावा.”
केतन अग्रवाल फादर स्टेटमेंट : आमच्या डोळ्यांनी आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे
आपला 26 वर्षांचा तरुण मुलगा गमावल्याचे दुःख व्यक्त करताना केतनचे वडील म्हणाले की, “त्या मुलीने आमचे हसतंखेळतं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. आम्ही आज फक्त नावालाच जिवंत आहोत. एका आई-वडिलांसाठी यापेक्षा मोठे दुःख जगात असू शकत नाही.”
यासोबतच, लग्न ठरवताना मध्यस्थी करणाऱ्या चुलत मामा-मामी नरेंद्र मित्तल आणि रेणू मित्तल यांच्यावर विश्वास ठेवणे हीच आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासावर विश्वास असून, न्यायदेवता आरोपींना कठोर आणि फाशीसारखी शिक्षा देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे पोलीस आता या नव्या दाव्याच्या आधारे सियाच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही बातमी वाचा:
Crime Patrol Style Theft Special Report : ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला चेन स्नॅचिंगचा कट; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Comments are closed.