64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा

पुणे मोशी इमारत कोसळली: पिंपरी चिंचवडच्या मोशीतील इमारत दुर्घटनेला (Pune Moshi Building Collapse) तीन दिवस उलटून गेले तरी बचावकार्य सुरूच असल्याचं चित्र आहे. मात्र इमारतीचा ढाचा कधीही ढासळू शकतो, अशी स्थिती निर्माण झालेली असतानादेखील जवानांनी खबरदारी घेत शोधकार्य सुरू ठेवलं आहे. अजूनही आठ कामगार अडकल्याची शक्यता आहे. दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते. 15 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही 8 जण स्लॅब खालीच अडकल्याचं बोललं जात आहे.

सदर घटनेला 64 तास उलटले तरी मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरुचं आहे. आता अत्याधुनिक कटरच्या मशनरीने दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडण्यात आला आहे. आता पहिल्या मजल्याचा स्लॅबचं पाडकाम सुरु करण्यात आलंय. या स्लॅब खालीच अडकलेले आठ कामगार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपेक्षा आहे की आज हे शोधकार्य संपेल. (Moshi Building Collapse)

देवेंद्र फडणवीसांनी मोशी दुर्घटनेचा घेतला आढावा- (Pune Moshi Building Collapse)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे मोशी येथील दुर्घटनेबाबतचा संपूर्ण घटनाक्रम समजून घेत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रशासन बचावाचे काम आज रात्री पूर्ण करेल, अशी माहिती आयुक्तांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. मोशी येथील लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीने गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. याशिवाय, दररोज प्रक्रिया न होता साचणाऱ्या सुमारे 100 टन कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी व्यवस्था उभारण्याबाबतही प्रशासनाला आवश्यक निर्देश यावेळी त्यांनी दिले. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर रवी लांडगे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नेमकं काय घडलं? (Pune Moshi Building Collapse)

पुण्यातील मोशी परिसरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. मोशीतील ही दुर्घटना बुधवार, 8 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता घडली. मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) मोशी येथील कचरा डेपोमधील ‘लेगसी वेस्ट’चा प्रचंड ढिगारा घसरून वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले आणि त्यानंतर NDRF, अग्निशमन दल व इतर यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले.

या दुर्घटनेत इमारतीचा मोठा भाग कोसळून अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. सुरुवातीला अनेक जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र काही कर्मचारी अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बचावकार्यासाठी NDRF, अग्निशमन दल, लष्कर आणि इतर आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून विषारी वायू, अस्थिर इमारत आणि सततचा पाऊस यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेनंतर कचरा व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासकीय निष्काळजीपणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातमी:

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत 9 जणांसाठी ‘देवदूत’ बनून धावले, 14 तासांचा श्वास रोखणारा थरार; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अग्निशमन दलाच्या जवानांची जीवाची बाजी!

Comments are closed.