पुण्यात प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज, शिवसेनेला फायदा होईल की नाही माहिती नाही पण आ
पुणे नगरपालिका निवडणुका: पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Pune Municipal Elections) नुकतीच जाहीर झालेली प्रारूप प्रभागरचना वादाच्या भोवऱ्यात अडकली असून, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) या रचनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराध्यक्ष सुभाष जगताप (Subhash Jagatap) यांनी भाजपवर टीका करत म्हटले की, “भाजपने महायुती धर्म पाळायला हवा होता, अशी खदखद त्यांनी बोलून दाखवली आहे.
शहराध्यक्ष सुभाष जगताप म्हणाले की, “शिवसेनेला या प्रभागरचनेचा काहीसा फायदा होईल की नाही हे सांगता येत नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिलेदारांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने फोडल्यामुळे पक्षाला फटका बसणार आहे. आम्ही यावर लवकरच हरकत घेणार असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल.”
उपनगरांतील प्रभागांत मोठे फेरबदल
प्रभागरचनेनुसार शहराच्या मध्यवर्ती भागातील पर्वती, कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या तशीच ठेवण्यात आली आहे. मात्र, उपनगरांतील प्रभागांत मोठे फेरबदल करण्यात आले असून, त्यामुळे नगरसेवकांची संख्या मर्यादित राहणार आहे. याचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रभागरचना ही विकासासाठी असावी, सत्तेसाठी नव्हे
राज्य सरकारने एक प्रभागात चार सदस्य असावा असा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रभागरचनेत महायुतीतील तिन्ही पक्षांचा समावेश होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जाहीर झालेली प्रारूप रचना पाहता फक्त भाजपला लाभ होईल अशीच मांडणी करण्यात आली आहे, असा आरोप जगताप यांनी केला. “पुणे शहरात आजही अनेक समस्या आहेत. प्रभागरचना ही विकासासाठी असावी, सत्तेसाठी नव्हे,” अशी भूमिका मांडत राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.
पुण्यात यंदा 41 प्रभाग
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी (दि. 22 ऑगस्ट) जाहीर करण्यात आली. यंदा 2017 मधील निवडणुकीच्या तुलनेत एक प्रभाग कमी करण्यात आला असून, एकूण प्रभागांची संख्या आता 41 झाली आहे. मात्र, सदस्यांची एकाने वाढ करून ती 164 वरून 165 करण्यात आली आहे. नव्या रचनेनुसार, 40 प्रभाग हे चार सदस्यांचे, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असणार आहे. हरकती आणि सूचनांसाठी 4 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, नागरिक तसेच राजकीय पक्ष यामध्ये सहभागी होऊ शकतात.
2011 च्या लोकसंख्येनुसार रचना
महापालिका निवडणूक तब्बल साडेआठ वर्षांनंतर होत आहे. फेब्रुवारी 2017 नंतर ही निवडणूक प्रथमच होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 2011 च्या जनगणनेची लोकसंख्या आधारभूत मानून ही प्रभागरचना करण्यात आली आहे.
लोकसंख्येचा तपशील :
एकूण लोकसंख्या : 34,81,359
अनुसूचित जात: 4,68,000
अनुसूचित जमाती : 40,000
याच आधारावर 165 नगरसेवक निवडले जाणार असून, 40 प्रभाग चार सदस्यांचे आणि 1 प्रभाग पाच सदस्यांचा असे प्रारूप निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.