Pune News – पुणे बाजार समितीत पुन्हा डाळिंबाच्या कोट्यवधींच्या मलईसाठी प्रशासन एकवटले, आडते संघटनांचा तीव्र विरोध

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने डाळिंब यार्डातील चार आडत्यांच्या शेडवर अर्धवट कारवाई करून, आता तेच शेड १४ ते १५ नवीन आडतदारांमध्ये वाटून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रक्रियेत प्रति व्यापारी १५ लाख रुपये याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार असल्याची चर्चा बाजारपेठेत रंगली असून, या प्रकाराला आडत्यांच्या दोन्ही प्रमुख संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.

डाळिंब यार्डातील जागावाटपाबाबत रविवारी (३ मे २०२६) बैठका पार पडल्याची माहिती समोर येत आहे. बाजार समितीने काही वर्षांपूर्वी वाढता व्यापार लक्षात घेऊन गेट क्रमांक ४ लगत सुमारे एक एकर जागा चार आडत्यांना दिली होती. मात्र, या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आणि वाढती आवक पाहता, इतर आडत्यांनीही जागेसाठी मागणी लावून धरली होती. दरम्यान, न्यायालयीन वादात असलेल्या जागेवर यार्ड उभारण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी हाणून पाडला होता. त्यानंतर बांबू मार्केटमधील जागेचा करारही तत्कालीन पणन संचालकांच्या स्थगितीमुळे रखडला होता. आता पुन्हा नव्या संचालक मंडळाच्या काळात हा विषय ऐरणीवर आला असून, मोठ्या आर्थिक तडजोडीतून जागावाटप होणार असल्याची चर्चा बाजारात सुरू आहे.

ज्या आडत्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्यांनाच पुन्हा मोक्याच्या जागी जागा दिली जाणार असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणात आता राज्य सरकार हस्तक्षेप करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“मार्केटयार्डातून बोरे, लिंबू आणि पालेभाज्यांचा व्यापार हळूहळू बाहेर गेला आहे, त्यामुळे मुख्य बाजार आता केवळ किरकोळ व्यापाराचे केंद्र बनत चालला आहे. सर्व व्यापार हा अधिकृत गाळ्यांवरच व्हायला हवा. अतिरिक्त मालासाठी बाजार समितीने सर्वांसाठी एकच मोठा ‘कॉमन हॉल’ उभारावा, जेणेकरून सर्व व्यापाऱ्यांना समान न्याय मिळेल.” – अमोल घुले (अध्यक्ष, श्री शारदा गजानन आडते असोसिएशन,मार्केटयार्ड)

“स्वतःचे अधिकृत गाळे भाड्याने देऊन पुन्हा शेतमालासाठी जास्तीच्या जागेची मागणी करणे चुकीचे आहे. ठराविक व्यापाऱ्यांना जागा दिल्यास त्यांची मक्तेदारी (मोनोपॉली) निर्माण होते. त्याऐवजी सर्वांसाठी ‘ओपन हॉल’ ठेवावा, जिथे आवक वाढल्यास कोणत्याही आडत्याला आपला माल लावता येईल.” – सौरभ कुंजीर (अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन, मार्केटयार्ड)

“बाजार आवारात काही व्यापाऱ्यांकडे डाळिंबाची मोठी आवक होते, त्यामुळे त्यांच्याकडून अतिरिक्त जागेची मागणी होत आहे. या मागणीचा सर्व पैलूंनी विचार करून संचालक मंडळ लवकरच योग्य निर्णय घेईल.” – डॉ. राजाराम धोंडकर,** (सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे)

Comments are closed.