Ratnagiri News – आरे-वारे येथे पर्यटकांना मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबईच्या दहिसर भागातून रत्नागिरीत फिरण्यासाठी आलेल्या कोरे कुटुंबाला आरे-वारे येथे भीषण अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रविण हरिश्चंद्र कोरे हे आपल्या परिवारासह कारने जात असताना, दोन गाड्यांमधून आलेल्या चार अज्ञातांनी त्यांच्या गाडीसमोर आपली वाहने आडवी लावून रस्ता अडवला. संशयितांनी विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि पर्यटकांनी जाब विचारला असता त्यांना बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात संशयितांनी प्रविण कोरे यांच्या डोक्यावर व हातावर बुक्क्यांनी प्रहार केला, तर त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की करत एकाने चाकू काढून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मारहाणीच्या या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील ६ ग्रॅमची सोन्याची चेन आणि ९ ग्रॅमची चांदीची अंगठी पडून नुकसान झाले. हल्लेखोरांनी फिर्यादीचा भाऊ आणि पुतण्यालाही मारहाण करून जखमी केले.
घटनेनंतर संशयितांनी काही काळ कोरे यांच्या गाडीचा पाठलाग केला आणि “गाडीचा नंबर घेतला आहे, तुम्हाला शोधून ठार मारू” अशी धमकी देऊन ते पसार झाले. याप्रकरणी प्रविण कोरे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी दोन कार नंबरच्या (MH-46-DA-9784 आणि MH-46-CE-7485) आधारे चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.