माझ्याकडे 34 एकर जमीन, 10-20 लाख असे टाकेन, मला नोकरीची गरज नाही; इंदापूरचा अधिकारी बोल बोल बोल
पुणे : नागरिकांशी गैरवर्तन आणि कामात कुचराई केल्याप्रकरणी इंदापूरमधील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. कुलकर्णी यांच्या संदर्भात अनेक तक्रारी मिळालेल्या होत्या. त्याची चौकशी केल्यानंतर तथ्य आढळल्याने त्यांंच्यावरती ही कारवाई करण्यात आल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या संदर्भात शेटफळगडे येथील संतोष रकटे यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रार केली होती. जमीन मोजणीची मूळ नक्कल न मिळाल्याने रकटे यांनी याबाबतची वरिष्ठांकडे तक्रार केलेली होती. त्याचा राग मनात धरून कुलकर्णी यांनी रकटे यांच्याशी गैरवर्तन केलं होतं, त्याचबरोबर मोठेपणा सांगत मला कामाची गरज नाही मी गमंत म्हणून काम करतो असंही त्यांनी म्हटलं होतं. याच वेळी कुलकर्णी यांनी नशा केल्याचीही तक्रार केली होती. उपअधीक्षकांनी केलेल्या चौकशीत याबाबतची तथ्ये आढळून आल्याने उपअधीक्षकांनी कुलकर्णी यांना निलंबित करण्याचे पत्र पुणे विभागाच्या उपसंचालकांना दिले होते. त्यानंतर उपसंचालक विष्णू शिंदे यांनी कुलकर्णीना निलंबित केले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
‘मला नोकरीची गरज नाही, मी एकुलता एक आहे, घरी साडे सतरा एकर ऊस आहे, साडे सतरा केळी आहे. मी खानदाणी माणूस आहे, बापाला माझ्या पावणे दोन लाख पेन्शन येते. जर मनात आलं ना 10-20 लाख रुपये टाकून असा मोकळा होतो’ असं म्हणत विवेकानंद कुलकर्णी यांनी आपला बडेजाव सांगितला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयात विवेकानंद कुलकर्णी यांची मुजोरी कॅमेऱ्यात कैद झाली, तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. अखेरीस हा अधिकारी निलंबित झाला आहे.
इंदापूर तालुक्यात राहणाऱ्या तक्रारदार संतोष महादेव रकटे यांनी शेटफळगडे येथील गट नंबर २५२ मो.र.नं. ५८१७/२०२१ याा प्रकरणाची संपूर्ण माहिती कागदपत्र मिळावी यासाठी अर्ज केला होता. त्यांनी ३ वेळा भूमाी अभिलेख कार्यालयात अर्ज केला. पण, अनेकदा येऊनही काही काम होईना. रकटे यांनी याबद्दल उपअधीक्षकांकडे आपली व्यथा मांडली. त्यांनी मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांच्याकडे पाठवलं. आता वरिष्ठांकडे आदेश आल्यामुळे कुलकर्णींना राग आला.
जेव्हा रकटे हे कार्यालयात पोहोचले, आपल्या कामाची स्थिती विचारत असतानाच कुलकर्णींनी आपला बडेजाव, आपण किती श्रीमंत आहोत, याचा पाढा वाचून अरेरावी केली. “डायरेक्ट साहेबांना भेटला म्हणजे काम होत नाही, साहेबांना कुठे पाठवलं, किंवा इतर कुणाला पाठवलं, मी कुणाला घाबरत नाही. मला नोकरीची गरज नाही, साडे सतरा एकर ऊस आहे, साडे सतरा केळी आहे. मी खानदाणी माणूस आहे, बापाला माझ्या पावणे दोन लाख पेन्शन येतेय. मी कोणालाच घाबरत नाही, ऑफिस बिफिस गेलं तिकडे, प्रेमात काम केलं तर कपडे सुद्धा काढून देईन. प्रेमात सगळी काम होतात. हे सगळं ऑफिस माझ्यामागे लागलं आहे. मला इथून काढण्यासाठी. मी लोकांची चांगलं काम करतो म्हणून. माझ्या मागे बाया सोडल्या, गडी सोडले, पण मी सगळ्यांना पुरून उरलो” असंही कुलकर्णी म्हणाले असल्याचं व्हिडीओमध्ये कैद झालं.
“एक गोष्ट लक्षात घ्या, मी खानदानी आहे, पैशाने मोठा आहे. पैसापाणी भरपूर आहे. द्यायचं ठरलं ना तर १० , २० लाख रूपये टाकून मोकळा होईल. घाबरलो असं समजू नका, ७५ एकर बागायती जमीन उजनीच्या कडेला आहे. शासकीय काम करतो, तुम्हाला वाटतं पगारासाठी करतोय, अर्रर्र असं समजू नका, मी हौस म्हणून काम करतो. काम करायचं म्हणून काम करतो. माझा बाप इतका मोठा आहे ना, पावणे दोन लाख रूपये पेन्शन आहे’ असं सांगत साहेबांना कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्ही घाबरत नाही. माझ्या विरोधात काय करायचं ते करा, अशा धमकीवजा वक्तव्यांमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अखेरीस या कुलकर्णी साहेबांवर आता निलंबनाची कारवाई केली आहे.
इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.#indapurnews #पुणे #व्हिडिओ व्हायरल pic.twitter.com/TUl0mGPndC
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) 20 जानेवारी 2026
आणखी वाचा
Comments are closed.