Pune News – झाडखाऊ सरकारचं करायचं काय… वृक्षतोडीविरोधात युवासेनेचा एल्गार; प्रशासनाविरोधात तीव्र निषेध आंदोलन

फोटो – चंद्रकांत पालकर

पुणे शहरात रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली ५०० हून अधिक जुनी झाडे तोडण्याच्या निर्णयाविरोधात युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाचा तीव्र निषेध केला आहे. ही झाडे १०० ते १५० वर्षे जुनी असून शहराच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा असा बळी देणे पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचे युवासेनेने म्हटले आहे.

या आंदोलनादरम्यान युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. मुळा-मुठा नदीपात्रात मेट्रोचे खांब उभे राहत असताना जर ते अडथळा ठरत नाहीत, तर मग ही झाडेच रस्ते रुंदीकरणासाठी अडथळा कशी ठरतात, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. महापालिकेने अद्याप अधिकृत वृक्ष संवर्धन समितीची नियुक्ती केलेली नाही, अशा स्थितीत पर्यावरणाशी संबंधित हे महत्त्वाचे निर्णय नेमके कोण आणि कोणत्या निकषांवर घेत आहे, याबाबत प्रशासनाने पारदर्शकता राखणे आवश्यक असल्याचेही युवासेनेने नमूद केले.

पुणेकरांनी देखील या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून मानवी साखळी करत ‘झाडे वाचवा’चा स्पष्ट संदेश दिला आहे. शाश्वत विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखणे ही काळाची गरज असून, जर आज झाडे वाचवली नाहीत तर उद्या पुण्याचा श्वासच बंद होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी झाडांची तोड तात्काळ थांबवून रस्ते रुंदीकरणासाठी पर्यायी उपाय शोधावेत आणि तातडीने अधिकृत वृक्ष संवर्धन समिती स्थापन करून त्यांच्या सल्ल्यानेच पुढील पावले उचलावीत, अशी मागणी युवासेनेने केली आहे. पुण्याचा आणि निसर्गाचा विनाश करून जर विकास होणार असेल, तर त्याविरोधात युवासेना कायमच आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात युवासेना कोर कमिटी सदस्य अंकित प्रभू, उत्तर महाराष्ट्र सचिव विराज कावडिया, युवासेना शहराधिकारी राम थरकुडे, युवराज पारिख, परेश खांडके, सोहम जाधव, प्रसाद जठार, चिंतामणी मुंगी, अंकित आहिरे, सोनू पाटील, गौरव गायकवाड, धवल जाधव, शेखर मोहिते, प्रवीण गायकवाड, किशोर अहिरे आणि रोहित कुचेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments are closed.