IPL 2026 – भाऊ हसत नाही पण फलंदाजांना रडवतो! सुनील नारायणच्या फिरकीचा ऐतिहासिक पराक्रम
कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्टार फिरकीपटू सुनील नारायणने IPL 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात एक अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत नारायणने आपल्या फिरकीची जादू दाखवत आयपीएल कारकिर्दीतील 200 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिलाच परदेशी खेळाडू ठरला असून त्याने क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे.
या सामन्यात केकेआरने एका धाडसी निर्णय घेत सुनील नारायणच्या हाती नवीन चेंडू सोपवला. मात्र, सुरुवातीला ट्रॅव्हिस हेडने नारायणवर हल्ला चढवत पहिल्या दोन षटकांत 20 धावा वसूल केल्या. सुरुवातीला हा निर्णय चुकला असे वाटत असतानाच, नारायणने 10 व्या षटकात केवळ 2 धावा देत सामन्यावर पकड मिळवली. त्यानंतर डावाच्या 16 व्या षटकात त्याने सलील अरोरा आणि इशान किशन या दोघांना बाद करून हैदराबादच्या धावसंख्येला वेसण घातली. त्याने आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 31 धावा देत 2 महत्त्वाचे बळी टिपले.
सुनील नारायण 200 विकेट्सचा टप्पा गाठणारा हा आयपीएलमधील एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी केवळ युझवेंद्र चहल (228) आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (215) या हिंदुस्थानी खेळाडूंनाच हा टप्पा गाठता आला होता. तीन वेळा आयपीएल विजेतेपद भूषवणाऱ्या नारायणने आता या ‘एलिट’ क्लबमध्ये प्रवेश करून आपल्या अष्टपैलू क्षमतेची प्रचिती दिली आहे. केकेआरसाठी हा टप्पा गाठणारा तो एकमेव गोलंदाज आहे.
Comments are closed.