मी त्या 6 पीडितांपैकी एक; ब्रिजभूषण सिंह अन् लैगिंक शोषण प्रकरण; विनेश फोगाटचा खळबळजनक दावा, Video शेअर करत म्हणाली…

हिंदुस्थानी कुस्ती क्षेत्रातील दिग्गज खेळाडू विनेश फोगाट हिने रविवारी (03 एप्रिल 2026) एक व्हिडीओ शेअर केला आहे. हिंदुस्थानी कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार करणाऱ्या सहा महिला कुस्तीपटूंमध्ये आपलाही समावेश असल्याचे जाहीर केलं आणि उत्तर प्रदेशात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसंदर्भात मनात असलेली भीती या व्हिडीओमध्ये बोलून दाखवली आहे.

विनेशने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. तिने म्हटले की, “प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असल्याने मला बोलायचे नव्हते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता मला सांगावे लागत आहे की, ज्या सहा महिलांनी तक्रार दाखल केली आहे, त्यापैकी मी एक आहे आणि आमची साक्ष देण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.” विनेश फोगाट 10 ते 12 मे दरम्यान उत्तर प्रदेशातील गोंडा येथे होणाऱ्या ‘नॅशनल ओपन रँकिंग’ स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. मात्र, या स्पर्धेच्या ठिकाणाबाबत तिने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गोंडा हा ब्रिजभूषण सिंह यांचा बालेकिल्ला मानला जातो.

ती म्हणाली की, “जर मी त्यांच्याच भागात जाऊन खेळणार असेन, जिथे प्रत्येक व्यक्ती त्यांच्याशी संबंधित आहे, तर तिथे मानसिक दडपण येणे स्वाभाविक आहे. अशा वातावरणात मी माझे 100 टक्के योगदान देऊ शकणार नाही. तिथे माझ्या टीमसोबत किंवा माझ्यासोबत काही अघटित घडल्यास त्याला सरकार जबाबदार असेल.” असं विनेशने म्हटलं आहे.

ब्रिजभूषण सिंह अद्यापही कुस्ती महासंघावर आपले नियंत्रण असल्याचे जाहीरपणे सांगतात, यावर विनेशने नाराजी व्यक्त केली. “ब्रिजभूषण कॅमेऱ्यासमोर सांगतात की त्यांनी एका माणसाची हत्या केली आहे, तरीही त्यांना शिक्षा होत नाही. त्यांच्या मानसिकतेचा विचार करा, ते काहीही करू शकतात. मला कोणतीही विशेष सवलत नको आहे, फक्त कुस्तीच्या मॅटवर होणारा निर्णय हा खेळाडूच्या मेहनतीवर आधारित असावा, कुण्या गुंडाच्या प्रभावाखाली नाही,” असे विनेशने ठणकावून सांगितले.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील वजनाच्या वादामुळे विनेशने निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु डिसेंबरमध्ये तिने आपला निर्णय मागे घेतला. आता तिचे लक्ष्य 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धा (जपान) आणि 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकवर आहे. आगामी स्पर्धा तिची 57 किलो वजनी गटातील पहिलीच स्पर्धा असणार आहे. विनेशने क्रीडा जगताला आणि प्रसारमाध्यमांना विनंती केली आहे की, गोंडा येथील स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षिततेवर आणि पारदर्शकतेवर लक्ष ठेवावे.

Comments are closed.