Punjabi Girl killed | पंजाबी तरुणीची कॅनडामध्ये हत्या लिव्ह-इन पार्टनर ताब्यात
► वृत्तसंस्था जालंधर
पंजाबमधील लुधियानाच्या समराला येथील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय दमनप्रीत कौर हिची कॅनडातील एडमंटन येथे तिच्या सोबत राहणाऱ्या जोडीदाराने हत्या केली. भांडणादरम्यान त्याने तिचा गळा दाबून खून केला.
एडमंटन पोलिसांनी या प्रकरणाला ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडीदाराकडून झालेली हत्या म्हणून घोषित केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मूळचा दिल्लीचा असलेल्या 22 वर्षीय आरोपी रितीश कुमार याला अटक केली असून, त्याच्यावर द्वितीय श्रेणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
दमनप्रीत कौर सुमारे पाच वर्षांपूर्वी कॅनडाला गेली होती. तिच्या शिक्षणासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी तिला परदेशात पाठवण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून आपली मुलगी आत्मनिर्भर होईल आणि कुटुंबाच्या आर्थिक अडचणी दूर होतील, अशी त्यांना आशा होती. पण आता, एकेकाळी तिच्या यशाची स्वप्ने पाहणारे तेच घर शोकाने भरले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिल्व्हरबेरी परिसरातील एका घरात एक तरुणी गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बेशुद्ध असलेल्या दमनप्रीतला तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनातून तिचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. तपास पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी मृत्यूचे कारण जाहीर केले नाही. परंतु नंतर खून असल्याचे निश्चित झाले आहे.
Comments are closed.