प्रज्ञानंदची ऐतिहासिक कामगिरी; विश्वविजेत्या कार्लसनला एकाच स्पर्धेत दोनदा धूळ चारत आनंदच्या 19 वर्षे जुन्या विक्रमाशी बरोबरी
हिंदुस्थानचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळ जगतात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. नॉर्वे चेस स्पर्धेच्या आठव्या फेरीत त्याने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव करत एका खास क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. एकाच प्रतिष्ठित स्पर्धेत कार्लसनला दोनदा पराभूत करण्याचा पराक्रम प्रज्ञानंदने केला असून हिंदुस्थानचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद यांच्या 19 वर्षे जुन्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली.
27 मे रोजी झालेल्या तिसऱ्या फेरीत प्रज्ञानंदने पांढऱ्या मोहोऱ्यांनी खेळताना कार्लसनला नमवले होते. त्यानंतर बुधवारी झालेल्या आठव्या फेरीत त्याने काळ्या मोहोऱ्यांनी खेळताना पुन्हा एकदा कार्लसनवर मात करत त्याला दुहेरी धक्का दिला. विशेष म्हणजे, गेल्या 2024 मध्ये झालेल्या नॉर्वे चेस स्पर्धेतही प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत केले होते.
दरम्यान, क्लासिक चेसच्या इतिहासात गेल्या 19 वर्षांत एकाच स्पर्धेत कार्लसनला दोनदा पराभूत करणारा प्रज्ञानंद हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 2007 मध्ये हिंदुस्थानचे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी लिनारेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसनला एकाच स्पर्धेत दोनदा पराभूत केले होते.
नॉर्वे बुद्धिबळ 2026 च्या राउंड 8 मध्ये प्रग्नानंदाने जागतिक नंबर 1 मॅग्नस कार्लसनला काळ्या तुकड्यांसह पराभूत करतानाचे अविश्वसनीय अंतिम क्षण पहा!
या विजयासह, प्राग हा पहिला भारतीय (आणि शक्यतो जगातील) खेळाडू ठरला ज्याने शास्त्रीय बुद्धिबळात मॅग्नस कार्लसनचा पराभव केला… pic.twitter.com/MFvJPdBHel
— चेसबेस इंडिया (@ChessbaseIndia) 2 जून 2026
दरम्यान, ऐतिहासिक विजय मिळवूनही 20 वर्षीय प्रज्ञानंदचे पाय जमिनीवर आहेत. मॅग्नस कार्लसनला हरवण्यापेक्षा या टप्प्यावर स्पर्धेत सामना जिंकणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. त्यामुळे मला हा विजय मिळवता आला, याचा आनंद आहे, असे ‘चेसबेस इंडिया’शी बोलताना प्रज्ञानंद म्हणाला.
कार्लसन खूप चांगला खेळला आणि त्याने अप्रतिम बचाव केला. इतर कोणताही खेळाडू असता तर अशा दबावाच्या परिस्थितीत लहान-सहान पोझिशनल चुका केल्या असत्या, पण कार्लसन अगदी शेवटपर्यंत योग्य चाली शोधत राहिला. एका क्षणाला मला वाटले की हा सामना ड्रॉ होईल, पण इतका चांगला बचाव केल्यानंतरही अचानक त्याच्याकडून झालेली चूक माझ्यासाठी पथ्यावर पडली, असेही तो म्हणाला.
Comments are closed.