घटस्फोट काही मुद्दामहून होत नाही; आयुष्यातील एक अध्याय संपला – राहुल देशपांडे
मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि त्यांची पत्नी नेहा देशपांडे हे दोघे कायदेशीररीत्या विभक्त झाले आहेत. राहुल देशपांडे यांनी घटस्फोटासंबंधी पोस्ट सोशल मीडियावर केली होती; परंतु या पोस्टनंतर त्यांना ट्रोल करण्यात आले होते. मात्र आता राहुल देशपांडे यांनी पहिल्यांदाच या घटस्पह्टाबद्दल मौन सोडले आहे. माझ्या आयुष्यातील एक अध्याय संपला असून घटस्फोट काही मुद्दामहून होत नाही, अशा शब्दांत त्यांनी झालेल्या घटस्फोटाबद्दल म्हटले आहे. ते एका पॉडकास्टमध्ये बोलत होते.
सोशल मीडियावर घटस्फोटाची माहिती दिल्यानंतर काही लोकांकडून राहुल देशपांडे यांना ट्रोल करण्यात आले. वैयक्तिक आयुष्यातील ही गोष्ट अशी जाहीरपणे कशाला सांगायची होती, असे प्रश्न विचारले गेले होते. यावर राहुल देशपांडे म्हणाले की, मी एक कलाकार म्हणून व माणूस म्हणून अतिशय प्रामाणिक आहे. मला वाटते की, जी माणसे मला फॉलो करतात, जे माझे चाहते असतील तर त्यांना सांगायचे होते की, आता हा अध्याय संपला आहे. एवढाच त्या पोस्टमागचा हेतू होता. रेणुका, मी व नेहा अशा खूप पोस्ट माझ्या अकाऊंटवर दिसतील. पूर्वी आम्ही कुठे बाहेर गेलो की, आमचे फोटो असायचे. आज मी अमूक इकडे गेलो, तिकडे गेलो असे एक्झिबिशन लावायचो नाही. पण अगदी जेवढय़ास तेवढं ठेवलं होतं. पण तशा बऱ्याच पोस्ट अजूनही आहेत. त्यामुळे आता आयुष्यातील हा अध्याय संपलाय तर त्याबद्दल लोकांना सांगायला पाहिजे, असं मला वाटलं. त्यामागे दुसरा कोणताही हेतू नव्हता, असे राहुल देशपांडे यांनी सांगितले.
आमचे संबंध आताही खूप चांगले आहेत
आमचा घटस्फोट झाला असला तरी आमचे संबंध आताही खूप चांगले आहेत. आम्ही रेणुकाचे आई-वडील आहोत आणि कायम राहू. आताही मी रेणुकाची पोस्ट टाकली, त्यात नेहा होती. नेहाने पोस्ट टाकली त्यात मी होतो. एखादा अध्याय संपल्यानंतर कशी तुझी चूक होती, कशी माझी चूक नव्हती असं काही लोक सांगतात; परंतु आमच्यात तसं काहीच नव्हतं. घटस्फोट काही मुद्दामहून होत नाही. त्याला विविध कारणे असतात. त्यात तुमचीही चूक असते, असेही राहुल यांनी म्हटले.
Comments are closed.