सोलापुरात भोंदू मनोहर भोसलेला अटक; जामिनावर असूनही भोंदूगिरी सुरूच, बाळूमामाच्या भक्तांची फसवणूक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

स्वतःला बाळूमामांचा अवतार सांगणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामाला सोलापूर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारासारखे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तो जामिनावर बाहेर असतानाही त्याची भोंदूगिरी सुरूच होती. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले.

सोलापूर जिह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कारवाईबाबत अधिक माहिती दिली. आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या प्रकरणात कुर्डूवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. भोंदूबाबा मनोहर भोसले याच्याविरुद्ध आधीच चार गुन्हे दाखल आहेत. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले होते. भोंदूगिरी तसेच आर्थिक फसवणूक प्रकरणात बारामती आणि दौंड पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. आता कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी केल्याप्रकरणी नवीन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलांवरील अत्याचाराव्यतिरिक्त पॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करतो, असे खोटे आश्वासन देऊन भक्तांची आर्थिक फसवणूक केली होती. तर अत्याचार प्रकरणी अटकेत असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.

उद्योगात भरभराट आणण्यासाठी 50 एक हजार घेतले

व्यवसाय आणि उद्योगात भरभराट आणण्यासाठी पूजा, अर्चा करायला हवी, असे सांगून त्याने एका व्यक्तीकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. या भक्ताने मनोहर आणि त्याच्या साथीदाराला 50 हजार रुपये दिले होते. परंतु, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या भक्ताने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात कुर्डूवाडी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत मनोहर भोसलेला पुण्यातून अटक केली आहे.

Comments are closed.