जव्हारमधील खडखड मंगल कार्यालयात उंदीर, घुशी, मोकाट जनावरांचे ‘अमंगल’ राज्य; दरवाजे-खिडक्या तुटलेल्या, कचऱ्याचे साम्राज्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खडखड गावातील मंगल कार्यालयात उंदीर, घुशींचे ‘अमंगल’ राज्य सुरू आहे. तुटलेले दरवाजे आणि खिडक्यांमुळे हे कार्यालय भूतबंगलाच झाला आहे. मोकाट जनावरांचा वावर वाढला असून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. याविरोधात अनेकदा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच मंगल कार्यालयाची ही अवस्था झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कार्यालय सुरू कधी होणार, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी विचारला आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग, जव्हारअंतर्गत २०१६-१७ मध्ये ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतून खडखड येथे मंगल कार्यालय उभारण्यात आले होते. यासाठी सुमारे ९ लाख ९९ हजार ६१३ रुपये खर्च करण्यात आला होता. ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव तयार करून तो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात सादर करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्प कार्यालयाने कामाला मंजुरी देत प्रशासकीय मान्यता दिली होती. वर्षभर या मंगल कार्यालयाचा वापर करण्यात आला. मात्र त्यानंतर हे कार्यालय वापराविना तसेच पडून होते. ग्रामपंचायतीने केलेल्या दुर्लक्षामुळे कार्यालयाचे दरवाजे-खिडक्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. तसेच उंदीर आणि घुशींनी ठिकठिकाणी पोखरले आहे.

भटक्या कुत्र्यांचा ताबा

संपूर्ण इमारत ओस पडलेली असून त्याचा भटक्या कुत्र्यांनी ताबा घेतला आहे. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमध्येही याच योजनेतून बांधण्यात आलेली मंगल कार्यालये, समाज मंदिरे आणि सभागृहे यांची अशीच दुरवस्था झाली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत गेल्या दहा वर्षांत बांधलेल्या सर्व इमारतींची सखोल चौकशी करावी अशी मागणी जव्हारवासीयांनी केली आहे.

Comments are closed.