RR vs SRH: वैभव सूर्यवंशीची दुखापत किती गंभीर? आरआरच्या प्रशिक्षकांनी दिले अपडेट
आयपीएल २०२६ च्या हंगामात शनिवारी (२५ एप्रिल) दुसरा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात खेळला गेला. यामध्ये आरआरचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. त्याने शतकी खेळी केली, मात्र क्षेत्ररक्षणाच्या वेळी तो लंगडत मैदानाबाहेर गेल्याने आरआरमध्ये चिंतेचे वातावरण दिसले. त्यांचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर यांनी त्याच्या दुखापतीचे अपडेट दिले आहेत.
एसआरएचची फलंदाजी सुरू असताना वैभवला दुखापत झाली. तो कव्हर्समध्ये उभा असताना इशान किशनने मारलेला उंच शॉटचा पाठलाग करताना तो धावला आणि अचानक आपली उजवी मांडी धरून थांबला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थ असल्याचे भाव स्पष्टपणे दिसत होते. त्याला हालचाल करणेही कठीण वाटत असताना संघाच्या फिजिओने त्याला मैदानाबाहेर नेले. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याचे कळताच चिंतेचे निर्माण झाले.
सुरूवातीला वैभवला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याची शक्यता होती, मात्र काही काळानंतर त्याला क्रॅम्प्स आल्याचे निष्पन्न झाले. शतकी खेळीनंतर लगेचच क्षेत्ररक्षण, अशा दमवणाऱ्या स्थितीत आणि त्यात सामना जयपूरमध्ये असल्याने तीव्र उष्णता याचा परिणाम वैभववर झाल्याचे दिसले. दुखापतीआधी त्याने ३७ चेंडूत १२ षटकार आणि पाच चौकारांसह १०३ धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट २७८.३८ राहिला. ही आयपीएलमधील स्फोटक खेळींपैकी एक ठरली.
वैभवच्या दुखापतीबाबत माहिती देताना राठौर म्हणाले, “त्याला हॅमस्ट्रिंगमध्ये काहीतरी जाणवत होते, आता मात्र तो ठिक आहे. त्याच्यावर उपचार झाले असून त्याची प्रकृत्ती उत्तम आहे. एक-दोन दिवसांत अधिक माहिती कळेल, मात्र सध्यातरी काही गंभीर नाही.”
सामन्यामध्ये एसआरएचने २२९ धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग केला. त्यांनी हा सामना ५ विकेट्सने जिंकला. यामध्ये त्यांच्याकडून अभिषेक शर्माने २९ चेंडूत ५७ धावा आणि इशानने ३१ चेंडूत ७४ धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत १३२ धावांची भागीदारी केली. दोघे बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन (२९) आणि नितीश कुमार रेड्डी (३६) यांनी डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली.
त्याआधी आरआरकडून वैभवच्या शतकाबरोबर विकेटकीपर-फलंदाज ध्रुव जुरेलनेही अर्धशतकी खेळी केली, मात्र फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर त्यांची २२८ धावसंख्या कमी पडली.
Comments are closed.