राहुल द्रविड यांच्या लहान मुलाची टीम इंडियामध्ये निवड, 'या' दौऱ्यासाठी बीसीसीआयने दिली संधी!

भारतीय क्रिकेटचे दिग्गज फलंदाज राहुल द्रविड यांचा लहान मुलगा निष्कर्ष द्रविड याला भारतीय अंडर-१९ (१९ वर्षांखालील) संघात स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने ४ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली असून, यामध्ये अन्वय द्रविडच्या नावाचाही समावेश आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय (ODI) आणि दोन बहु-दिवसीय (Multi-day) सामने खेळणार आहे. बीसीसीआयच्या ज्युनिअर क्रिकेट समितीने श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या पुरुष अंडर-१९ संघाची घोषणा केली. या संघाचे कर्णधारपद यशवर्धन सिंह चौहान याच्याकडे सोपवण्यात आले आहे, तर लक्ष्य रायचंदानी याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

​अन्वय द्रविडचा एकदिवसीय संघात यष्टीरक्षक-फलंदाज (Wicketkeeper-Batsman) म्हणून समावेश करण्यात आला आहे. रजत बघेलसह तो संघातील दोन यष्टीरक्षकांच्या पर्यायांपैकी एक असेल. दुसरीकडे, बहु-दिवसीय सामन्यांसाठी मानव कृष्णा आणि आर्यन संदेश सकपाल यांची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. १७ वर्षीय अन्वयने नुकतेच ‘विनू मांकड ट्रॉफी’मध्ये कर्नाटक अंडर-१९ संघाचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने उपांत्यपूर्व (Quarter-final) फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत त्याने ६ सामन्यात २२० धावा केल्या होत्या, ज्यात नाबाद ८२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.

​अन्वय यापूर्वी बंगळुरू येथे आयोजित त्रिकोणीय घरगुती मालिकेत भारत अंडर-१९ ‘बी’ संघाचाही भाग राहिला आहे. या स्पर्धेत भारत अंडर-१९ ‘ए’ आणि अफगाणिस्तान अंडर-१९ च्या संघांनीही भाग घेतला होता.

​घरगुती क्रिकेटमधील सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला अंडर-१९ वन-डे चॅलेंजर ट्रॉफीसाठी संघ ‘सी’ (Team C) मध्ये निवडीच्या रूपाने मिळाले. आता पहिल्यांदाच त्याची परदेशी दौऱ्यासाठी भारतीय अंडर-१९ संघात निवड झाली आहे.

​मोठा मुलगा समितलाही मिळाली आहे संधी

​राहुल द्रविड यांचा मोठा मुलगा समित द्रविड याचीही २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरगुती मालिकेसाठी भारताच्या अंडर-१९ संघात निवड झाली होती. मात्र, दुखापतीमुळे त्याला त्या मालिकेत भाग घेता आला नव्हता.

Comments are closed.