पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून ‘राहुरी’ विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी

अहमदनगर : राज्यातील दोन विधानसभा (पोटनिवडणूक) मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघात निवडणुका बिनविरोध करण्यासाठी राजकीय नेत्यांचे प्रयत्न आहेत. मात्र, दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याचा प्रयत्नही इतर राजकीय पक्षांकडून सुरू आहे. त्यातच, दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी मतदारसंघातील निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने येथून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे, राहुरीची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. तर, बारामतीमध्येही (Baramati) वंचित उमेदवार देणार का? याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे.

राहुरी, पाथर्डी आणि नगर या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्हा कार्यकारिणीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यांची संयुक्त बैठक घेऊन अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतला. अनिल जाधव हे गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणारे, अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, याबाबत माहिती देताना राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सांगितले की, “आजपर्यंत या मतदारसंघात प्रस्थापितांना उमेदवारी देण्याची परंपरा राहिली आहे. मात्र, संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि जातीवादी मानसिकतेला पराभूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका संघर्षशील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.” दरम्यान, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपने याआधीच दिवंगत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर केली आहे

राहुरीत राष्ट्रवादी देखील उमेदवार देणार (Rahuri byelection)

दुसरीकडे बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच राहुरी पोटनिवडणुकीसाठी मात्र विचारमंथन सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीत उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले असून राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात पक्षाची महत्वाची बैठक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे उमेदवारीसाठी इच्छुक असून राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढवायची की नाही? यासंदर्भात उद्याच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

हेही वाचा

अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा

आणखी वाचा

Comments are closed.